तामिळनाडूत निषेध, धरणे
By admin | Published: January 19, 2017 04:55 AM2017-01-19T04:55:16+5:302017-01-19T04:55:16+5:30
जल्लीकट्टूवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्याच्या निषेधार्थ तामिळनाडूत अनेक ठिकाणी शांततापूर्ण निषेध आणि धरणे सुरु आहेत.
चेन्नई : जल्लीकट्टूवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणल्याच्या निषेधार्थ तामिळनाडूत अनेक ठिकाणी शांततापूर्ण निषेध आणि धरणे सुरु आहेत. चेन्नई, कोयम्बतूरसह अनेक भागात हे आंदोलन होत आहे. आंदोलकांना समर्थन वाढत आहे.
तामिळनाडूत नमक्कल येथे वकीलांच्या संघटनेने कामकाजावर बहिष्कार टाकला. चेन्नईत आंदोलकांनी काळे कपडे परिधान करुन राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. मरिना बीचवर हजारो लोक जमले असले तरी आंदोलन अतिशय शांततापूर्ण वातावरणात सुरु आहे. कोणत्याही राजकीय पक्षांचा या आंदोलनात हस्तक्षेप नाही. कारण, येथे आलेल्या अण्णाद्रमुक आणि द्रमुकच्या काही नेत्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
अलांगनाल्लूर येथे हजारो तरुणांनी आंदोलन केले. हे आंदोलन रात्रीही सुरुच होते. अनेक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि मोठ्या हॉलमध्ये या आंदोलकांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. दक्षिणेतील अभिनेते विजय, अभिनेते सूर्या, जी. व्ही. प्रकाश, गायक अरुणराजा कामराज आणि अन्य कलाकारांनीही या आंदोलनाला समर्थन जाहीर केले आहे.
>सरकारने केली चर्चा
राज्याचे मत्स्य पालन मंत्री डी. जयकुमार आणि अन्य एक मंत्री पांड्याराजन यांनी बुधवारी आंदोलकांशी चर्चा केली. यातून ठोस तोडगा निघू शकला नाही. तर, या प्रकरणी राष्ट्रपतींशी संपर्क करुन अध्यादेश काढण्याची मागणी करणार असल्याचे या तरुणांनी सांगितले.