अभिमानास्पद! ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 01:31 PM2020-01-17T13:31:14+5:302020-01-17T13:37:50+5:30
१६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली - कुलभूषण जाधव प्रकरणात हरीश साळवे यांनी भारताची भक्कम बाजू मांडून पाकिस्तानला तोंडावर पाडलं होतं. तेच मराठमोळे हरीश साळवे आता परदेशात आपली अव्वल कामगिरी करून दाखवणार आहे. भारताचे माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे क्वीन काऊंसिल (क्युसी - QC) म्हणून काम पाहण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. १६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती जाहीर करण्यात येणार आहे.
ब्रिटिश सरकारच्या माहितीनुसार, महाराणीने ११४ वकिलांना नियुक्त केलं आहे. याशिवाय १० वकिलांचा सन्मान करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केले आहे. द हेग येथील कुलभूषण प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू भक्कमपणे मांडणारे मराठमोळे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली असल्याने भारतासाठी अभिमानाची गोष्ट म्हणावी लागेल. ब्रिटनच्या न्याय मंत्रालयाने नव्या नियुक्त्यांसंदर्भातील यादी प्रसिद्ध केली. त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठमोळ्या हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. इंग्लंड आणि वेल्सच्या न्यायालयांसाठी महाराणीचे सल्लागार (QC) म्हणून हरीश साळवे यांना नियुक्त करण्यात आली आहे. महाराणीकडून हे पद वकिलांचं विशेष नैपुण्य पाहून प्रदान करण्यात येते.
एकूण ११४ बॅरिस्टर्स आणि कायदेपंडितांची महाराणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती. ११४ पैकी ३० महिला, २२ बिगर ब्रिटन वंशांचे, २६ सल्लागार, ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले, ४ सॉलिसिटर अॅडव्होकेट या पदासाठी जवळपास २५८ अर्ज आले होते, त्यातील ११४ जणांची नियुक्ती झाली. १६ मार्च रोजी शाही समारंभात या ११४ जणांची महाराणीच्या उपस्थितीत औपचारिक नियुक्ती केली जाईल.
नवी दिल्ली - ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या राणीचे सल्लागार म्हणून नियुक्ती https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) January 17, 2020
कुलभूषणच्या खटल्यासाठी फक्त १ रुपया फी घेतली
देशातील सर्वात महागडे वकील म्हणून हरिश साळवेंची ओळख आहे. मात्र, कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्यासाठी त्यांनी फक्त एक रुपया फी घेतली. हरिश साळवे कोर्टात एकदा हजर राहण्यासाठी साडे चार ते पाच लाख रुपये घेतात असंही बोललं जातं. तर संपूर्ण दिवसासाठी त्यांची फी २५ ते ३०लाख रुपयांपर्यंत सांगितली जाते. दिल्लीतील भगवान दास रोडवरील व्हाईट हाऊसमध्ये हरिश साळवे यांचं कार्यालय आहे. तर ते ज्या घरात राहतात त्याची किंमत कोट्यवधी रुपये सांगितली जाते.
वकिलीचे बाळकडू आजोबा, पणजोबांकडून मिळाले
हरीश साळवे यांना घरातूनच वकिलीचे बाळकडू मिळालं असं म्हणावं लागेल. कारण त्यांचे आजोबा पी. के. साळवे. ते प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. याशिवाय त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. हरीश साळवेंचे वडील वडील हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. १९९२ मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि १९९९ मध्ये त्यांना सॉलिसिटर जनरल म्हणून काम करण्याची संधी मिळाली. वकिली करण्याआधी ते सीए झाले. मात्र, नंतर त्यावेळचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची पदवी मिळवली. वकील झाल्यापासून साळवेंनी अनेक मोठे खटले लढले आहेत. यात कुलभूषण जाधव, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद, बिल्किस बानो प्रकरण, व्होडाफोन आणि केंद्र सरकारव वाद अशा अनेक मोठ्या खटल्यांचा अनुभव साळवेंकडे आहे. हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये ४३ व्या क्रमांकावर आहे.