'३७० रद्द होणे देशासाठी अभिमानाचे'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 03:30 AM2019-11-23T03:30:20+5:302019-11-23T03:30:37+5:30
झारखंडमधील सभेत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे मत
बिश्रामपूर (झारखंड) : घटनेतील अनुच्छेद ३७० मुळे जम्मू आणि काश्मीरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा नरेंद्र मोदी सरकारने रद्द करून देशासाठी अभिमानाची गोष्ट केली, असे भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले. ते येथील पलामूत शुक्रवारी निवडणूक प्रचारसभेत बोलत होते.
गडकरी म्हणाले, अनुच्छेद ३७० मुळे देशाचे ऐक्य व एकात्मतेला धोका निर्माण झाला होता. जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यासाठी तत्कालीन काँग्रेस सरकारांनी काहीही उपाय केला नाही कारण त्यांना मते गमवावी लागतील याची भीती होती.
झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल या विरोधी पक्षांवर हल्ला करून गडकरी म्हणाले की, या पक्षांची आघाडी ही तात्पुरती असून अशा खिचडीला मतदारांनी मते देऊ नये. रघुबर दास यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारने गेल्या पाच वर्षांत चांगले प्रशासन दिले, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)