दहशतवादी मुलाचा मृतदेह न स्वीकारणा-या पित्याचा अभिमान- राजनाथ सिंह
By admin | Published: March 9, 2017 04:03 PM2017-03-09T16:03:28+5:302017-03-09T16:19:42+5:30
लखनऊ चकमकीत ठार झालेला दहशतवादी सैफुल्लाचा मृतदेह नाकारणा-या पित्याचा अभिमान वाटतो असं कौतुक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - लखनऊ चकमकीत ठार झालेला दहशतवादी सैफुल्लाचा मृतदेह नाकारणा-या पित्याचा अभिमान वाटतो असं कौतुक केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. लोकसभेत लखनऊ चकमकीवर निवेदन देत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. चकमकीत ठार झालेल्या दहशतवादी सैफुल्लाचे वडिल सरताज मोहम्मद यांनी एका देशद्रोह्याचा मृतदेह मी स्विकारणार नाही असं सांगत मृतदेह स्विकारण्यास नकार दिला होता. त्यांच्या या निर्णयाचं राजनाथ सिंह यांनी लोकसभेत कौतुक करताना आम्हाला तुमचा अभिमान आहे असं म्हटलं आहे.
त्या वडिलांसाठी मी सहानुभूती व्यक्त करतो, सदनमधील सर्वांचं माझ्याशी एकमत असेल अशी खात्री व्यक्त करतो. सरकरला अशा पित्याचा अभिमान वाटतो', असं राजनाथ सिंह बोलले आहेत. सरताज मोहम्मद यांनीदेखील यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून 'हा संदेश संपुर्ण देशासाठी असला पाहिजे. माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला प्रतिष्ठित मंत्र्याकडून आदराची वागणूक मिळत असल्याचं सांगत त्यांनी आभार व्यक्त केले.
लखनऊत तब्बल 12 तास सुरु राहिलेच्या चकमकी सैफुल्ला ठार झाला आहे. कमांडोजनी त्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न करत आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला ठार करण्यात आल्यानंतर त्याच्याजवळून इसीसचा झेंडा आणि ट्रेन टाईमटेबल सापडलं.
दहशतवादी सैफुल्लाच्या वडिलांनी त्याचा मृतदेह घेण्यास नकार दिला आहे. आपल्या मुलाला देशद्रोही म्हणत एका देशद्रोह्याचा मृतदेह मी घेणार नाही असं बोलले. दुसरीकडे सैफुल्लाच्या नातेवाईकांना त्याच्याबद्दल कळल्यानंतर धक्काच बसला. मात्र दुसरीकडे अटक करण्यात आलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या पित्यांनी आपली मुलं निर्दोष असल्याचा दावा केला.
सैफुल्लाचे वडील सरताज यांनी बुधवारी अंतिम संस्कार करण्यासाठी आपल्या मुलाचा मृतदेह घेण्यास नकार दिला. ते बोलले की, 'त्याने देशविरोधी काम केलं आहे. आम्ही त्याच्यावर नाराज असून अशा देशद्रोह्याचा मृतदेह अजिबात घेणार नाही'. त्यांनी सांगितलं की, 'कौटुंबिक भांडणानंतर सैफुल्ला घरातून निघून गेला होता, आणि त्यानंतर परत आलाच नाही'. सरताज यांनी सांगितलं की, 'काहीच काम करत नसल्याने काही महिन्यांपुर्वी मी त्याला मारलं होतं, त्यानंतर तो घर सोडून पळून गेला होता. गेल्या महिन्यात फोन करुन त्याने आपण सौदीला चाललो असल्याचं सांगितलं होतं'.
सैफुल्ला चकमकीत ठार झाल्यापासून त्याच्या नातेवाईकांना त्याने दहशतवादाचा मार्ग स्विकारला होता यावर विश्वासच बसत नाही आहे. एका नातेवाईकाने सांगितलं की, 'प्रत्येकजण आश्चर्यचकित आहे. दिवसातून पाच वेळा तो नमाज पडत असे. त्याच्याबद्दल असा विचार आम्ही कधीच केला नव्हता'.