गर्व स कहो हम आंदोलनजीवी है, संजय राऊतांचा मोदींवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 11:09 AM2021-02-09T11:09:06+5:302021-02-09T11:09:47+5:30
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युतर दिलंय. विशेष म्हणजे गर्व से कहो हम हिंद है... या घोषवाक्याचं रुपांतरच त्यांनी आंदोलनजीवी या शब्दाशी जोडून केलंय.
नवी दिल्ली - राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणासंदर्भात आभार प्रदर्शनाचे भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी आंदोलनावरही भाष्य केले. शेतकरी आंदोलनासंदर्भात बोलत असताना मोदींनी आंदोलनजीवी या शब्दाचा वापर केला. त्यावरुन सध्या देशभरात राजकारण तापलं आहे. राजकीय विश्लेषक आणि शेतकरी आंदोलनातील नेते योगेंद्र यादव यांनी आंदोलनजीवी शब्दावरुन मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. तर, शेतकरी नेते राकेश टीकैत यांनीही मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही ट्विट करुन आम्ही आंदोलनजीवी असल्याचा आम्हाला गर्व असल्याचं लिहलंय.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करत मोदींच्या आंदोलनजीवी टीकेला प्रत्युतर दिलंय. विशेष म्हणजे गर्व से कहो हम हिंद है... या घोषवाक्याचं रुपांतरच त्यांनी आंदोलनजीवी या शब्दाशी जोडून केलंय. त्यामुळे, एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न राऊत यांनी केलाय. राऊत यांनी ट्विटरवरुन शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टीकैत यांच्या समवेतचा फोटो शेअर केला आहे. तसेच, गर्व से कहो हम आंदोलनजीवी है... जय जवान- जय किसान असेही राऊत यांनी म्हटलंय. तसेच, मराठीतही याच आशयाचे ट्विट राऊत यांनी केलंय.
गर्वसे कहो..
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 8, 2021
हम सब आंदोलनजीवी है..
जय जवान
जय किसान! pic.twitter.com/8zSXztMUf2
योगेंद्र यादव यांची टीका
"हो मी आंदोलनजीवी आहे. कारण भारताला स्वातंत्र्य एका आंदोलनामुळेच मिळालं आहे. या देशाने अनेक मोठमोठी आंदोलनं पाहिली आहेत. त्या आंदोलनाच्या माध्यमातूनच परिवर्तन झालं आहे. काँग्रेस काळात पंतप्रधान मोदीच जनआंदोलनाची गोष्ट करत होते. पेट्रोल-डिझेलच्या किमतीवरुन त्यांच्या पक्षानंही आंदोलनं केली होती" असं देखील योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. "कधी-कधी वाटतं की पंतप्रधान मोदींना काँग्रेसची खरी गरज आहे. जर काँग्रेस राहिली नाही तर पंतप्रधानांचं काय होईल?" असं म्हणत यादव यांनी हल्लाबोल केला आहे. "दुसऱ्यांच्या आधारावर जगणाऱ्याला परजीवी म्हणतात. पंतप्रधान मोदी यांनी आज एक नवा शब्द जन्माला घातला आहे. तो म्हणजे आंदोलनजीवी. पंतप्रधान मोदी आम्हाला घाबरत आहेत. ते खूप मोठ्या खुर्चीवर बसले आहेत. अशावेळी त्यांना अशा पद्धतीचं बोलण शोभा देत नाहीत" असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते पंतप्रधान
आम्ही 'बुद्धीजीवी' हा शब्द ऐकला होता. परंतु आता काही लोकं 'आंदोलनजीवी' झाले आहेत. देशात काहीही झालं की ते त्या ठिकाणी पोहोचतात. कधी ते पडद्याच्या मागे असतात तर कधी पुढे. अशा लोकांना ओळखून आपल्यालाला त्यांच्यापासून वाचायला हवं, असं म्हणत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी निशाणा शाधला. "जे आंदोलनजीवी लोकं आहेत ते स्वत: आंदोलन चालवू शकत नाहीत. परंतु कोणाचं आंदोलन सुरू असेल तर ते त्या ठिकाणी पोहोचतात. ही लोकं कोणत्याही ठिकाणी सापडतात. वकिलांच्या आंदोलनात वकीलांसोबत ते दिसतील, विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही तेच असतात, कधी मागे तर कधी पुढे येऊन ते आंदोलनात सहभागी होतात. वेगवेगळ्या आंदोलनातून ते त्यांचे विचार आणि चुकीच्या, भ्रामक गोष्टी पसरवात. सर्वच आंदोलनजीवी हे परजीवी असतात. ते आंदोलनाशिवाय जगू शकत नाही," असंही मोदी म्हणाले. सध्या नवा FDI आला आहे. त्या 'फॉरेन डिस्ट्रक्टिव आयडियोलॉजी'पासून आपल्याला वाचलं पाहिजे, असंही आंतरराष्ट्रीय कटाबद्दल बोलताना मोदींनी नमूद केलं.