देशाबाहेरील संपत्तीची संपूर्ण माहिती द्या
By admin | Published: October 26, 2016 01:12 AM2016-10-26T01:12:30+5:302016-10-26T01:12:30+5:30
देशाबाहेरील आपल्या संपत्तीचे संपूर्ण तपशील चार आठवड्यात सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती विजय मल्याला दिले.
नवी दिल्ली : देशाबाहेरील आपल्या संपत्तीचे संपूर्ण तपशील चार आठवड्यात सादर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती विजय मल्याला दिले.
न्या. कुरियन जोसेफ आणि न्या. आर. एफ. नरिमन यांच्या पीठाने हे आदेश दिले. चार कोटी डॉलरच्या रकमेचा तपशील न दिल्याबद्दल न्यायालयाने मल्या यांच्यावर तीव्र ताशेरे ओढले. ही रक्कम मल्याला यंदाच्या फेब्रुवारीत ब्रिटिश कंपनी डियोजिओकडून मिळाली होती.
न्यायालयाने म्हटले की, ४ कोटी डॉलरची रक्कम कधी मिळाली. तिचा वापर कसा केला गेला याची माहिती देण्याचे आदेश ७ एप्रिल रोजी आम्ही दिले होते. प्रथम दर्शनी असे दिसते की, या आदेशांचे नीट पालन झालेले नाही. विदेशातील सर्व संपत्तीची माहिती देण्यासाठी आता तुम्हाला चार आठवड्यांची मुदत देण्यात येत आहे. याची सुनावणी २४ नोव्हेंबरला ठेवण्यात आली. यापूर्वी मल्याच्या वतीने भारतातील त्यांच्या संपत्तीची माहिती न्यायालयाला देण्यात आली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)