कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे देणार ग्रामीण भागात आरोग्यसेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 03:39 AM2020-03-05T03:39:10+5:302020-03-05T03:39:21+5:30
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीत त्यासंदर्भात गांभिर्याने विचार सुरू आहे, अशी माहिती समितीच्या सदस्य तथा मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
भावेश ब्राह्मणकर
नवी दिल्ली : ग्रामीण आणि दुर्गम भागात येत्या काळामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे (आर्टीफिशियल इंटेलिजन्स) आरोग्यसेवा मिळू शकणार आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीत त्यासंदर्भात गांभिर्याने विचार सुरू आहे, अशी माहिती समितीच्या सदस्य तथा मेजर जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.
जगभरात सध्या कृत्रिम बुद्धीमत्तेबाबत बहुविध प्रकारचे संशोधन सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवी जीवनात अमुलाग्र बदल आणण्याची क्षमता यामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात त्याचा काय आणि कसा उपयोग होऊ शकेल, याबाबत प्राधान्याने विचार केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी निगडीत समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यातही कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराबाबत गांभीर्याने विचा केला जात आहे.
देशापुढील महत्त्वाच्या प्रश्नांवर हे तंत्रज्ञान कसे उपयुक्त ठरू शकते, यासाठी समितीचे सदस्य विविध प्रकारचे प्रस्ताव तसेच सूचना देत आहेत. देशाच्या दुर्गम आणि ग्रामीण भागात आरोग्यसेवा उपलब्ध होत नाही. डॉक्टर अशा भागात जाण्यासाठी इच्छुक नाहीत. वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने जीवितहानी होते. हे देशाचेच नुकसान आहे. सीमा क्षेत्रात व अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत कार्यरत असलेल्या जवानांनाही आवश्यक तेव्हा आरोग्यसेवा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे कृत्रिम बुद्धीमत्तेद्वारे ग्रामीण व दुर्गम भागात कशा पद्धतीने आरोग्यसेवा मिळू शकेल, याचा विचार समितीत केला जात आहे.
निती आयोगापासून पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार आणि अन्य महत्त्वाच्या व्यक्ती तसेच संस्था यांच्याकडून त्याची पडताळणी केली जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आणि तोटे आहेत. मात्र, आपण त्याचा चांगला फायदा कसा करुन घेऊ शकतो आणि सर्वसामान्यांचे जीवनमान कसे उंचावू शकतो, हे पाहणे हिताचे आहे. आरोग्यसेवेतही कृत्रिम बुद्धीमत्ता अमुलाग्र बदल घडवू शकते. तशी क्षमता त्यात आहे. या क्षेत्रात जितके अधिक संशोधन आणि अभ्यास होईल, त्याचा अधिकाधिक फायदा घेता येईल.
>विविध प्रस्ताव, सूचनांवर विचार
येत्या काळात कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रत्यक्ष चपखल वापर झाल्याचे पहायला मिळाले तर त्यात नवल राहणार नाही, असेही डॉ. कानिटकर म्हणाल्या. याशिवाय विविध प्रकारचे प्रस्ताव आणि सूचना माझ्याकडे आहेत. त्यासाठी मी विविध व्यक्ती, तज्ज्ञ आणि संस्थांनाही भेटत असते, संवाद साधत असते. आणि अभ्यासही सुरू आहे. त्यामुळे समितीमध्ये सूचना तसेच प्रस्ताव देण्यास मी इच्छुक असते. यापुढील काळातही हा प्रयत्न कायम राहील, असे कानिटकर यांनी स्पष्ट केले.