पक्षविरोधी कारवाया केल्याचा पुरावा द्या!
By admin | Published: December 26, 2015 02:16 AM2015-12-26T02:16:10+5:302015-12-26T02:16:10+5:30
आपण पक्षाचा निष्ठावान सैनिक असल्याचे नमूद करून ‘पक्षविरोधी कारवाया’ केल्याबद्दलचा एखादा तरी पुरावा देण्याची मागणी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्लाबोल
नवी दिल्ली : आपण पक्षाचा निष्ठावान सैनिक असल्याचे नमूद करून ‘पक्षविरोधी कारवाया’ केल्याबद्दलचा एखादा तरी पुरावा देण्याची मागणी वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर हल्लाबोल केल्याबद्दल पक्षातून निलंबित करण्यात आलेले खासदार कीर्ती आझाद यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे केली आहे.
बिहारच्या दरभंगा येथून तीनवेळा लोकसभेची निवडणूक जिंकणारे आझाद यांनी शहा यांना एक पत्र पाठवून ही मागणी केली. आपल्याला बजावण्यात आलेल्या निलंबनाच्या नोटिसीमध्ये डीडीसीएतील भ्रष्टाचाराचा कुठेही उल्लेख नाही, याकडे आझाद यांनी शहा यांचे लक्ष वेधले. डीडीसीएतील भ्रष्टाचारावरूनच आझाद यांनी जेटली यांना लक्ष्य केले होते. आझाद या पत्रात म्हणतात, ‘निलंबन नोटिसीत डीडीसीएतील भ्रष्टाचाराचा उल्लेखच नसल्याने भाजपाला या मुद्याशी काही देणेघेणे नाही आणि हा मुद्दा पूर्णत: पक्षाच्या कक्षेबाहेरचा आहे, असा माझा विश्वास झाला आहे. निष्पक्षपणे आणि स्वाभाविक न्यायाच्या सिद्धांताअंतर्गत पक्षाच्या हितांच्या विरोधात काम करण्याच्या माझ्याविरुद्ध लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांमधून माझे नाव मिटविण्याची एक संधी मला मिळेल, याची मी प्रतीक्षा करीत आहे,’ असे आझाद यांनी या पत्रात लिहिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)