मदरसा, वेद पाठशाळांमध्ये शालेय क्रमिक शिक्षणही द्यावे
By admin | Published: January 2, 2017 01:09 AM2017-01-02T01:09:56+5:302017-01-02T01:09:56+5:30
मुस्लिमांच्या मदरशांमध्ये आणि हिंदुंच्या वेद पाठशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना धार्मिक शिक्षणासोबत सरकारमान्य क्रमिक शालेय शिक्षणही दिले जावे
नवी दिल्ली : मुस्लिमांच्या मदरशांमध्ये आणि हिंदुंच्या वेद पाठशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांना धार्मिक शिक्षणासोबत सरकारमान्य क्रमिक शालेय शिक्षणही दिले जावे, अशी शिफारस राष्ट्रीय बालहक्क सुरक्षा आयोगाने केली आहे.
अशी व्यवस्था केली की, मदरसा व पाठशाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही शालेय विद्यार्थी म्हणून गणले जावे, जेणेकरून शाळाबाह्य मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल, असेही आयोगाचे मत आहे.
बालहक्कांचे रक्षण आणि संवर्धन यासाठी काम करणारी आयोग हीदेशातील सर्वोच्च वैधानिक संस्था आहे. केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाच्या शिक्षणविषय केंद्रीय सल्लागार समितीच्या उपसमितीस सादर केलेल्या अहवालात आयोगाने ही शिफारस केली आहे. शाळाबाह्य मुलांचा मागोवा घेऊन त्यांना पुन्हा शिक्षणाकडे वळविण्यासाठी काय करता येईल यावर विचार करून अहवाल देण्यास आयोगास सांगण्यात आले होते.
आयोग म्हणतो की, मदरसा, वेद पाठशाळा यासारख्या अनौपचारिक संस्थांमध्ये व अमान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये जाणाऱ्या मुलांचाही मागोवा घेतला जावा. मदरसा व वेदपाठशाळांनाही त्या त्या राज्यांच्या शालेय शिक्षण मंडळांशी संलग्नता देण्यात यावी आणि तेथे धार्मिक शिक्षणासोबत सरकारमान्य शालेय पाठ्यक्रमही शिकविला जावा.
सन २०११ च्या जनगणनेनुसार शाळेत न जाणाऱ्या मुलांची संख्या
8.4 कोटी होती.
आयोगाचे सदस्य प्रियांक कनूंगो यांच्या मते, जनगणनेतील या शाळाबाह्य मुलांच्या संख्येत मदरसा व वेद पाठशाळांमध्ये जाणाऱ्या मुलांची गणना कलेली नाही.
या दोन प्रकारच्या अनौपचारिक शिक्षणसंस्थाही विचारत घेतल्या तर शाळाबाह्य मुलांची संख्या सुमारे २.५ कोटींनी कमी भरेल.
मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये मदरसा मंडळे आहेत. तेथील सर्व मदरशांना या मंडळाची संलग्नता असून, तेथे धार्मिक शिक्षणाखेरीज शालेय पाठ्यक्रमातील मूलभूत विषयही शिकवले जातात.
अशा मुलांना गणित, विज्ञान व समाजशास्त्र हे विषयही शिकविले जात असल्याने, तेथील मुलांना शाळाबाह्य म्हणता येणार नाही, असेही कनूंगो म्हणाले.