सुरक्षेबाबतची गोपनीय माहिती चीनला दिली; भारतीय पत्रकारासह तिघे अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 05:28 AM2020-09-20T05:28:16+5:302020-09-20T05:28:45+5:30
चिनी महिला । नेपाळी नागरिकाचाही कृष्णकृत्यांमध्ये समावेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशाच्या सीमेवरील भारतीय लष्कराच्या हालचालींची गोपनीय माहिती चिनी गुप्तहेर यंत्रणांना पुरवीत असल्याच्या आरोपावरून संरक्षण विषयावर लेखन करणारे मुक्त पत्रकार राजीव शर्मा, तसेच एक चिनी महिला व नेपाळी नागरिक अशा तीन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली
आहे.
डोकलाम, गलवान येथे भारतीय सैन्य कशाप्रकारे तैनात केले आहे याची माहितीही राजीव शर्मा चीनला पुरवीत होता, असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.
राजीव शर्माला दोन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. त्याच्या केलेल्या चौकशीनंतर क्विंग शी ही चिनी महिला, तसेच राज बोहरा या नेपाळी नागरिकालाही पोलिसांनी अटक केली आहे.
या त्रिकुटाकडून गोपनीय कागदपत्रे जप्त करण्यात आली. राजीव शर्मा हा चिनी गुप्तहेर संघटनेच्या मायकेल नावाच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होता. चीन, भूतानलगतच्या सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या हालचालींची गोपनीय माहिती राजीवने चीनला पुरविली होती.
सहा महिन्यांत ४० लाख रुपयांची कमाई
च्२०१६ सालापासून राजीव शर्मा हा चीनच्या ग्लोबल टाइम्स वृत्तपत्रासाठी दर महिन्याला १० लेख लिहीत असे. त्या प्रत्येक लेखाचे मानधन म्हणून राजीवला चीनकडून ५०० डॉलर मिळत; पण हा दिखावा होता. खरेतर भारतीय लष्कराची गोपनीय माहिती चीनला पुरविल्याच्या प्रत्येक कामगिरीसाठी हे पैसे त्याला बनावट चिनी कंपन्यांमार्फत देण्यात येत असत.
च्अशा रीतीने राजीव शर्मा दर महिन्याला ५ हजार डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त कमाई करीत असे. गेल्या सहा महिन्यांत राजीवने अशा प्रकारे ४० लाख रुपये मिळविले. बनावट चिनी कंपन्यांचे काम दिल्लीमध्ये क्विंग शी ही चिनी महिला व राज बोहरा हा नेपाळी नागरिक पाहत होते. त्यांच्या कंपन्यांमार्फत राजीव शर्मा याला मोबदला पोहोचता केला जायचा. त्यामुळे क्विंग शी, राज बोहरा यांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्व व्यवहाराची ईडीमार्फतही चौकशी होणार असल्याचे कळते.