कर्करोगावर केमोथेरपीच्या गरजेचा निर्णयाची चाचणी सिद्ध
By admin | Published: May 28, 2015 01:20 AM2015-05-28T01:20:09+5:302015-05-28T01:20:09+5:30
स्तनाचा कर्करोग झालेल्यांना केमोथेरपीच्या क्लेशकारक उपचाराची खरोखर गरज आहे काय, हे निश्चित करू शकणारी चाचणी एका भारतीय कंपनीने विकसित केली आहे.
नवी दिल्ली : स्तनाचा कर्करोग झालेल्यांना केमोथेरपीच्या क्लेशकारक उपचाराची खरोखर गरज आहे काय, हे निश्चित करू शकणारी चाचणी एका भारतीय कंपनीने विकसित केली आहे. भारतासह संपूर्ण जगात स्तन कर्करोगाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही चाचणी महिलांसाठी दिलासादायक वरदान ठरणार आहे.
ही चाचणी जनुकीय परीक्षणाची असून कर्करोग झालेल्या महिलांना केमोथेरपी घेण्याची गरज आहे काय? केमोथेरपी टाळता येईल काय? याची माहिती देईल. मैमाप्रिंट नावाची ही चाचणी स्तनाचा कर्करोग झालेल्या महिलांना पुन्हा कर्करोग होण्याचा धोका आहे किंवा नाही याचा आढावाही घेईल. धोका नसलेल्या महिलांना केमो घेण्याची गरज राहणार नाही. इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयातील सर्जिकल आॅन्कॉलॉजी विभागातील डॉ. आर. सरीन यांनी दिलेल्या माहितीनुसार मैमाप्रिंट चाचणीत ७० जनुकांचे परीक्षण केले जाईल. कर्करोगाची जनुकीय फाईल पाहून संबंधित महिलेच्या प्रकृतीचा अंदाज घेऊन उपचार करणे त्यातून शक्य होणार आहे. डॉ. सरीन यांच्या गाठीशी मुंबईतील अॅट्रॅक (पूर्वीची कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट) संस्थेच्या संचालकपदाचा अनुभव आहे. अॅट्रॅक हा भाभा अणुशक्ती केंद्राच्या अखत्यारीतील उपक्रम आहे. भारतात नव्या जनुकीय चाचण्या सुरु करण्याचे श्रेय लाभलेल्या आयलाईफ डिस्कव्हरीज या कंपनीचे प्रमुख आनंद गुप्ता यांच्या मते कर्करोगाच्या वेळीच निदानाइतकेच त्यावरील उपचाराचे यश कर्करोगाचा प्रकार जाणून घेण्यावर अवलंबून असते. स्तन कर्करोग होणाऱ्या सर्व महिला रुग्णांना पुन्हा कर्करोग होण्याचा धोका टाळण्यासाठी केमोथेरपी करण्याची गरज नसते. केमोथेरपी रुग्णाच्या जीवनावरही परिणाम करते. देशात सुरु होणारी नवी मैमाप्रिंट व ब्लूप्रिंट तंत्राची चाचणी कर्र्क रोग तज्ञांना रोगाची व्याप्ती, तीव्रता अणि रोग्याच्या जीवाला असलेला धोका समजण्यास मदत करेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)