मनोरुग्ण वैमानिकाने २०० प्रवाशांचा जीव घातला धोक्यात
By Admin | Published: September 2, 2016 08:11 AM2016-09-02T08:11:54+5:302016-09-02T08:11:54+5:30
अचानक वैमानिकाचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे विमानातील २०० प्रवाशांसह क्रू सदस्यांचे जीव धोक्यात आल्याची घटना समोर आली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - विमान उड्डाणवस्थेत असताना अचानक वैमानिकाचे मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे विमानातील २०० प्रवाशांसह क्रू सदस्यांचे जीव धोक्यात आल्याची घटना समोर आली आहे. २८ एप्रिल रोजी एअर इंडियाच्या बोईंग ७८७ या दिल्ली-पॅरिस विमान प्रवासात प्रवाशांना या धक्कादायक अनुभवातून जावे लागले.
या घटनेच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सदर वैमानिकाला मानसोपचारांची गरज असून, त्याने सहवैमानिक म्हणून सहा महिने काम करावे असा निष्कर्ष काढला आहे. सहा महिन्यांच्या कालावधीत या वैमानिकाची वर्तणूक तपासावी असे या समितीने म्हटले आहे.
सध्या या वैमानिकाला विश्रांती देण्यात आली असून, एअर इंडियाने या घटनेच्या तपासासाठी आणखी एक समिती नियुक्ती केली असून, ती समिती या वैमानिकाला क्लीनचीट देण्याची शक्यता आहे. २८ एप्रिलला सदर वैमानिकाने विमानातील संगणक व्यवस्थेशी छेडछाड केली आणि विमानाला क्षमतेपेक्षा जास्त उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला.
विमानाला क्षमतेपेक्षा जास्त उंचीवर नेले तर, विमान अस्थिर होते. फ्लाईट कंट्रोलकडून कुठलीही मदत मिळत नाही. मुख्य वैमानिकाने विमानाची उंची वाढवण्याचा प्रयत्न करताच सहवैमानिकाने आक्षेप घेतला. पण त्याने सहवैमानिकाचा सल्ला धुडकावून उंची वाढवली. सुदैवाने नंतर विमान सुरक्षित उंचीवर आणल्याने धोका टळला. सहवैमानिकाने वरिष्ठांना या घटनेची माहिती दिल्यानंतर चौकशी समिती स्थापन करण्यात आली.