‘पीटीआय’ने घेतली चिनी राजदूतांची मुलाखत; प्रसारभारती नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 01:00 AM2020-06-29T01:00:43+5:302020-06-29T07:02:51+5:30

वृत्तसंस्थेशी करार तोडण्याची दिली धमकी : ‘ते’ वृत्त राष्ट्रविरोधी असल्याचा केला आरोप; वृत्तसंस्थेची कृती सकारात्मक मूल्यांच्या विरोधात

PTI interviews Chinese ambassador; Prasarbharati angry | ‘पीटीआय’ने घेतली चिनी राजदूतांची मुलाखत; प्रसारभारती नाराज

‘पीटीआय’ने घेतली चिनी राजदूतांची मुलाखत; प्रसारभारती नाराज

googlenewsNext

नवी दिल्ली : चीनचे राजदूत सन वेडाँग यांची भारतावर टीका करणारी मुलाखत प्रसारित केल्याप्रकरणी प्रसारभारतीने प्रेस ट्रस्ट आॅफ इंडिया (पीटीआय) या वृत्तसंस्थेशी कराराचा फेरआढावा घेण्याचे ठरविले आहे. पीटीआयने दिलेले वृत्त राष्ट्रविरोधी आणि देशाच्या एकात्मतेस बाधा आणणारे असल्याचा आरोपही प्रसारभारतीने केला आहे.

प्रसारभारतीने पीटीआयला एक पत्र पाठविले असून, त्यात म्हटले आहे की, तुम्ही प्रसारित केलेल्या बातमीत देशहिताच्या विरोधात आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे देशाच्या प्रादेशिक एकात्मतेला बाधा पोहोचली आहे. आता पीटीआयसोबतच्या कराराचा फेरआढावा घेण्याची वेळ आली आहे. प्रसारभारती ही संस्था पीटीआयची वर्गणीदार आहे. पीटीआय ही देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था आहे. चीनच्या राजदूतांची मुलाखत प्रसारित केल्याने ही संस्था आता वादात सापडली आहे. प्रसारभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही पीटीआयला ६.७५ कोटी रुपये वार्षिक वर्गणी देतो. दरम्यान, पीटीआयचे प्रमुख संपादक विजय जोशी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. चिनी राजदूतांची जी मुलाखत प्रसारित करण्यात आली त्याचे वृत्तसंस्थेने समर्थन केले
आहे.

प्रसारभारती ही आकाशवाणी आणि दूरदर्शन यांचे नियंत्रण करणारी संस्था आहे. त्यांनी पीटीआयला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सार्वजनिक प्रसारक म्हणून वृत्तसंस्थेची कृती या देशासाठी सकारात्मक मूल्यांच्या विरोधात आहे. प्रसारभारती कायदा १९९० च्या कलम १२ मध्ये ज्या मूल्यांचा उल्लेख आहे, त्यांची वृत्तसंस्थेने पायमल्ली केली आहे. त्यामुळे यापुढे आम्हाला पीटीआयची सेवा सुरू ठेवण्यात स्वारस्य वाटत नाही. प्रसारभारतीच्या कायद्यान्वये सार्वजनिक सेवा प्रसारकाने त्याची कामे करताना देशाची एकता व अखंडता याला बाधा येईल, असे काही करू नये. प्रसारभारतीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, २०१७-१८ मध्ये त्यांची वर्गणी २५ टक्के कमी केली आहे. पीटीआयच्या मंडळात पत्रकारांचा समावेश असून, स्वतंत्र संचालक नाहीत. प्रसारभारतीला प्रतिनिधित्व नाही. प्रसारभारती पीटीआयला सर्वाधिक रक्कम देते.

पीटीआयचे म्हणणे काय?
पीटीआयने म्हटले आहे की, प्रसारभारतीची भूमिका आणि कराराचा फेरआढावा घेण्याचा विचार अन्याय्य आणि चुकीचा आहे.
चिनी राजदूतांची जी मुलाखत घेतली होती त्याचा एकतर्फी भाग चिनी दूतावासाने प्रसारित केला. त्याच्या आधारे वृत्तसंस्थेवर एकतर्फी टीका होत आहे.

नाराजीचे कारण काय?
पीटीआयने गत आठवड्यात चीनचे राजदूत वेडाँग यांची मुलाखत घेतली होती. गलवानमधील संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या घटनेस भारतच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

अनेक परदेशी वृत्तसंस्थांशी पीटीआयचे करार आहेत.
१९४७ मध्ये पीटीआयची नोंदणी झाली. वृत्तसंस्थेचे काम १९४९ मध्ये सुरूझाले. या वृत्तसंस्थेचे संचालक मंडळ असून, मुख्य कार्यकारी अधिकारी रोजचे काम पाहतात.

Web Title: PTI interviews Chinese ambassador; Prasarbharati angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.