आमच्याकडून 'चौकीदार' होण्याची अपेक्षा ठेवू नका; 3.20 लाख बँक अधिकाऱ्यांचं मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 07:47 AM2019-03-28T07:47:12+5:302019-03-28T07:48:24+5:30
सरकारी बँकांमधील अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच ट्विटरवरुन डॉक्टर, वकील, अभियंते, शिक्षक, बँक आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 'मैं भी चौकीदार' मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. मात्र देशातील सरकारी बँक अधिकाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या 'द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन'नं या संघटनेनं याबद्दल असमर्थतता दर्शवली आहे. यासाठी संघटनेनं थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहिलं आहे. आमचे महत्त्वाचे प्रश्न सोडवा. ते सुटेपर्यंत आमच्याकडून 'मैं भी चौकीदार' या राजकीय मोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा ठेवू नका, असा पवित्रा संघटनेनं घेतला आहे. 'बिझनेस स्टँडर्ड'नं या इंग्रजी दैनिकानं हे वृत्त दिलं आहे.
'द ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फडरेशन'नं (एआयबीओसी) पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात सरकारी बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा पाढा वाचला आहे. यामध्ये बँकांचं विलिनीकरण, कर्मचारी भरती यांच्यासह अनेक प्रश्नांचा समावेश आहे. या पत्राची प्रत आर्थिक सेवा विभाग आणि इंडियन बँक्स असोसिएशनलाही (आयबीए) पाठवण्यात आली आहे. एआयबीओसी सरकारी बँकांमधील कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना आहे. जवळपास 3 लाख 20 हजार अधिकारी (एकूण अधिकाऱ्यांच्या 85 टक्के) या संघटनेचे सदस्य आहेत.
'सरकारी बँकांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मूळ समस्यांकडे लक्ष न देता तुम्ही आमच्याकडून 'मैं भी चौकीदार' या राजकीय प्रचारमोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करु नका. सरकारी बँक कर्मचारी सरकारच्या धोरणांमुळे त्रासलेले आहेत,' असं एआयबीओसींनं मोदींना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. एआयबीओसीचा विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलिनीकरणाला विरोध आहे. याविरोधात संघटनेनं दिल्ली उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे. बँकांमध्ये उच्च पदांवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं वेतन बँकांच्या कामगिरीवर आधारित असावं, यासाठी इंडियन बँक्स असोसिएशन प्रयत्नशील आहे. यालाही बँक कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.