गेल्या वर्षभरात बँकांमध्ये 30 हजार कोटींचे घोटाळे- आरबीआय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 06:29 PM2018-06-27T18:29:03+5:302018-06-27T18:31:20+5:30
सरकारी बँकांमध्ये सर्वाधिक घोटाळे
मुंबई: गेल्या वर्षभरात देशभरातील बँकांमध्ये तब्बल 30 हजार कोटी रुपयांचे घोटाळे झाले असल्याची आकडेवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रसिद्ध केली आहे. 2017-18 या आर्थिक वर्षात देशभरातील बँकांमध्ये साडे सहा हजार घोटाळे झाले आहेत. यातील 85 टक्के घोटाळे सरकारी बँकांमध्ये झाल्याची माहिती आरबीआयनं दिली आहे.
आरबीआयनं फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट (एफएसआर) प्रसिद्ध केला आहे. '2017-18 या आर्थिक वर्षात बँकिंग व्यवस्थेतील 6 हजार 500 घोटाळे समोर आले. या घोटाळ्यांचं मूल्य 30 हजार कोटी रुपये इतकं होतं', अशी आकडेवारी या अहवालात आहे. 'गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग व्यवस्थेत 1 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या घोटाळ्यांचं प्रमाण वाढलं आहे. बँकिंग व्यवस्थेतील घोटाळ्यांची संख्याच वाढली नसून घोटाळ्याचं मूल्यदेखील प्रचंड प्रमाणात वाढलं आहे,' असं आरबीआयनं अहवालात नमूद केलं आहे.
सरकारी बँकांमधील घोटाळ्यांचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं आरबीआयचा अहवाल सांगतो. एकूण घोटाळ्यांपैकी 85 टक्के घोटाळे सरकारी बँकांमध्ये झाले आहेत. 2018 मध्ये झालेल्या सर्वाधिक 10 घोटाळे पाहिल्यास, केवळ या 10 घोटाळ्यांमुळे बँकांना तब्बल 10 हजार कोटींचा चुना लावण्यात आला आहे. फसवणूक करुन घेतल्या जाणाऱ्या कर्जातून सर्वाधिक घोटाळे होतात, असं अहवालात अधोरेखित करण्यात आलं आहे.