सरकारमुळे जनता आर्थिक संकटात
By admin | Published: November 13, 2016 03:27 AM2016-11-13T03:27:33+5:302016-11-13T03:27:33+5:30
नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत घाईघाईत आणि कोणतेही नियोजन न करता हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा त्रास संपूर्ण देशाला सहन
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने अत्यंत घाईघाईत आणि कोणतेही नियोजन न करता हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा त्रास संपूर्ण देशाला सहन करावा लागत आहे. सामान्य लोक आर्थिक संकटात सापडले आहेत.
हा निर्णय घेण्यापूर्वी सरकारने गांभीर्याने विचार केलाच नाही, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिबल यांनी शनिवारी केली. ते म्हणाले की, अत्यंत घाईघाईत नोटा बंद करण्यात आल्या. आता काळा पैसा अन्य स्वरूपात रूपांतरित केला जात आहे. नोटा बंदीचा निर्णय हा नरेंद्र मोदी यांचा आणखी एक ‘निवडणूक जुमला’ आहे. नोटांवर बंदी घातल्यानंतर देशात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. लोक पैशांअभावी त्रासले आहेत. अशा वेळी पंतप्रधानांनी देशात असायला हवे होते. मात्र ते जपानला निघून गेले आहेत. कपिल सिबल म्हणाले की, सरकारमुळे लोक प्रचंड त्रासले आहेत. रोख रक्कम मिळण्यासाठी बँका आणि एटीएम केंद्रांबाहेर प्रचंड मोठ्या रांगा लागल्या आहेत. खाते माझे आहे, पैसा माझा आहे, मग मी कित्येक तासन्तास रांगेत का उभे राहायचे? मात्र मोदी सरकारकडे या प्रश्नाचे उत्तर नाही.
मी सामान्य माणूस असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत करीत असतात. ते काही लोकांसारखे रांगेत उभे राहिलेले नाहीत. त्यांना तसे करण्याची वेळही येत नाही. खर्चाची तोंडमिळवणी कशी करायची असते, हे त्यांना माहितीच नाही. पीठ, डाळी आणि साखर यांची किंमत काय आहे, हे त्यांना माहिती नाही. त्यामुळे लोकांच्या हालाची या सरकारला कल्पनाच नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काल सामान्य नागरिकांसोबत रांगेत उभे राहून एका बँकेतून नोटा बदलून घेतल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कपिल सिबल यांची सरकारवरील टीका आली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)