सामान्याचा सोशल लढा, एनडीटीव्हीला मागायला लावली माफी
By Admin | Published: November 1, 2016 01:40 PM2016-11-01T13:40:48+5:302016-11-01T13:45:56+5:30
सोशल मिडियाचा वापर करुन एका सामान्य व्यक्तीने प्रतिष्ठीत चॅनेल एनडीटीव्हीला माफी मागायला भाग पाडले आहे
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - एखाद्या न्यूज चॅनेलवर चुकीची बातमी दाखवण्यात येत असेल तर तुम्ही काय करता? अनेकदा मित्रांशी, सोशल मीडियावर चर्चा केली जाते, त्याबद्दल एखादं ट्विट किंवा पोस्ट टाकली जाते. त्यानंतर वाद-विवाद होतात आणि तो मुद्दा थोड्या दिवसांनी विसरुन जातो. सोशल मिडिया फक्त एक करमणुकीचं साधन नसून आपण त्याचा योग्य वापर करत लढाही देऊ शकतो. अशाच प्रकारे सोशल मिडियाचा वापर करुन एका सामान्य व्यक्तीने प्रतिष्ठीत चॅनेल एनडीटीव्हीला माफी मागायला भाग पाडले आहे.
चैतन्य जोशी असं या व्यक्तीचं नाव असून ट्विटरला त्यांचे फक्त 200 फॉलोअर्स आहेत. जून 2016 रोजी चैतन्य जोशी एनडीटीव्ही चॅनेलवरील 'राईज अॅण्ड फॉल ऑफ नेशन्स' कार्यक्रम पाहत होते. 'एनडीटीव्हीवरील राजकीय बातम्या एकतर्फी असल्याने मी त्या पाहणे टाळतो. डॉ प्रणॉय रॉय आणि रुचीर शर्मा या कार्यक्रमात सहभागी असल्याने मी हा कार्यक्रम पाहत होतो. त्यावेळी मला काहीतरी विचित्र पाहायला मिळाले', असं चैतन्य जोशी यांनी सांगितलं.
@RajivPratapRudy NDTV shame.shows Kashmir part of Pakistan. shows wrong India map please take action pic.twitter.com/IYpSfxvjeO
— Chaitanya Joshi (@chaitanyajoshi) June 28, 2016
'मी अत्यंत लक्ष देऊन आणि बारकाईने कार्यक्रम पाहत होतो. त्यांनी स्क्रीनवर भारताचा नकाशा दाखवला आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. अक्साई चीन हा भाग चीनमध्ये दाखवण्यात आला तर पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचं त्यांनी नकाशात दाखवलं होतं. एक भारतीय चॅनेलच देशाचा अपमान करत होतं. ही चूक डॉ प्रणॉय रॉय यांच्यादेखील लक्षात आली नाही, आणि तोच नकाशा वारंवार त्याच चुकांसहित दाखवण्यात आला. त्यानंतर मी कॅमेरा काढून फोटो काढण्यास सुरुवात केली', असं चैतन्य जोशी यांनी सांगितलं.
चैतन्य जोशींनी यानंतर ही चूक लक्षात आणून देण्यासाठी बरखा दत्त, प्रणॉय रॉय या सर्वांना ट्विट केलं. मात्र कोणीच काही उत्तर दिलं नाही. पण ते इतक्यावरच थांबले नाही. त्यांनी मध्यवर्ती सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीकडे (CPGRAMS) तक्रार केली आणि पुरावे म्हणून फोटोदेखील पाठवले. तसंच पोलीस तक्रारही केली.
@narendramodi sir an apology is not sufficient for insulting India done by NDTV more action ought to be taken pic.twitter.com/oDoUVy8Sqo
— Chaitanya Joshi (@chaitanyajoshi) October 28, 2016
काहीच होत नसल्याने सर्व आशा संपल्या होत्या असं चैतन्य यांना वाटत होतं. मात्र एक दिवस अचानक त्यांना माहिती आणि प्रसारण मंत्रायल तसंच न्यूज स्टँडर्ड ब्रॉडकास्टिंग अथॉरिटीकडून एक पत्र आलं ज्यामध्ये एनडीटीव्हीला त्यांच्या चुकीसाठी माफी मागण्यात सांगण्यात आलं होतं.
एनटीव्हीला 5 नोव्हेंबर रोजी रात्री 9 च्या प्राईट टाईम शोमध्ये चूक झाल्याचं मान्य करत माफी मागण्यास सांगण्यात आलं आहे.
'आपण प्रत्येकजण हे करु शकतो. मी हातात बंदूक घेऊन सीमारेषेवर लढायला जाऊ शकत नाही, पण पाकिस्तानी कलाकार असलेला चित्रपट पाहणार नाही तसंच चीनी मालाची खरेदी करायची नाही असं ठरवू शकतो. तिरंग्याचा किंवा नकाश्याचा अपमान मी सहन करणार नाही' अशा भावना चैतन्य जोशी यांनी व्यक्त केल्या आहेत. फक्त सोशल मीडियाच्या आधारे एका सामान्य व्यक्तीने दिलेला लढा आणि त्यातून मिळालेला विजय हे नक्कीच इतरांसाठी उदाहरण आहे.