परीक्षार्थ्यांची ओळख उघड न करता केंद्र, शहरनिहाय निकाल जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचा नॅशनल टेस्टिंग एजन्सीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 05:48 AM2024-07-19T05:48:07+5:302024-07-19T05:48:44+5:30

उद्या दुपारी बारा वाजेपर्यंतची मुदत

Publish centre-wise, city-wise results without disclosing the identity of examinees; Supreme Court order to National Testing Agency | परीक्षार्थ्यांची ओळख उघड न करता केंद्र, शहरनिहाय निकाल जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचा नॅशनल टेस्टिंग एजन्सीला आदेश

परीक्षार्थ्यांची ओळख उघड न करता केंद्र, शहरनिहाय निकाल जाहीर करा; सर्वोच्च न्यायालयाचा नॅशनल टेस्टिंग एजन्सीला आदेश

नवी दिल्ली :परीक्षार्थ्यांची ओळख उघड न करता नीट-यूजी परीक्षेचे केंद्र व शहरनिहाय निकाल येत्या शनिवारी, २० जुलै रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) गुरुवारी दिला. गैरप्रकारांमुळे नीट-यूजीच्या संपूर्ण प्रक्रियेच्या पावित्र्यालाच धक्का लागल्याचे आढळून आले; तरच ही परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश देता येतील, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले.

नीट-यूजीची ५ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करावी, फेरपरीक्षा घेण्यात यावी; तसेच न्यायालयाच्या देखरेखीखाली परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी व्हावी, अशा मागण्या करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. त्यावर न्यायालयात २२ जुलै रोजी पुन्हा युक्तिवादाला प्रारंभ होणार आहे.

प्रश्नपत्रिका फुटण्यासह आणखी गैरप्रकार झाले असून, त्यामुळे फेरपरीक्षा घेण्याची आवश्यकता आहे. हा दावा पुराव्यांनिशी मांडावा.

प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकरण पाटणा व हजारीबागपुरतेच मर्यादित होते, असे सकृतदर्शनी दिसत आहे. गुजरातच्या गोध्रामध्ये प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार घडला, असे म्हणता येणार नाही.

पैसे मिळविण्यासाठी प्रश्नपत्रिका फोडण्यात आली. त्याचे परिणाम राष्ट्रीय पातळीवर व्हावेत, असा हेतू या गैरकृत्यांमागे होता, असे दिसत नाही.

प्रश्नपत्रिका फुटण्याच्या प्रकारांचे स्वरूप व्यापक असते, तर विविध शहरांत असे प्रकार घडल्याचे व ते घडविणाऱ्यांची नावे समोर आली असती.

नियोजनबद्ध पद्धतीने प्रश्नपत्रिका फोडण्यात आली, हे याचिकाकर्त्यांनी सिद्ध करून दाखवावे.

‘त्या’ केंद्रातील परीक्षार्थींना जास्त गुण मिळाले का हे तपासायचे आहे

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, गैरप्रकार झाल्याचे आरोप असलेल्या केंद्रांतील परीक्षार्थींना इतर केंद्रातील परीक्षार्थींपेक्षा जास्त गुण मिळाले की नाही हे तपासायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ओळख उघड न करता केंद्रनिहाय निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला.

एखाद्याकडे डमी रोल नंबर असू शकतात. पण कोणत्या केंद्रात किती गुण मिळाले आहेत ही माहिती मिळायला हवी. सीबीआयने तपासाबाबत सादर केलेला स्थितीदर्शक अहवाल आपल्याला मिळाला नसल्याची याचिकादारांची तक्रार आहे.

मात्र या अहवालातील गोष्टी उघड झाल्या तर त्याचा तपासावर परिणाम होईल असे सीबीआयने सांगितले होते. त्याबद्दल न्यायालयाने म्हणाले की, आम्ही या प्रकरणाचा अत्यंत पारदर्शकपणे विचार करत आहोत. पण सीबीआयने सांगितलेला मुद्दाही महत्वाचा आहे.

पाटणा एम्सच्या चार विद्यार्थ्यांना अटक

नीट-यूजीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयने बिहारमधील पाटणा एम्सच्या चार विद्यार्थ्यांना गुरुवारी अटक केली. त्यातील तिघे हे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षात तर एक दुसऱ्या वर्षात आहे. चौघांना बुधवारी हॉस्टेलमधील त्यांच्या रूममधून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या रूम सीबीआयने सील केल्या होत्या. चंदन सिंह, राहुल अनंत, कुमार शानू, करण जैन, अशी या चार विद्यार्थ्यांची नावे आहेत.

Web Title: Publish centre-wise, city-wise results without disclosing the identity of examinees; Supreme Court order to National Testing Agency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.