'गांधी मला भेटला होता'च्या प्रकाशकांनी माफी मागावी - सुप्रीम कोर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2015 11:58 AM2015-05-14T11:58:06+5:302015-05-14T12:25:02+5:30
'गांधी मला भेटला होता' या कवितेवर गेल्या २१ वर्षांपासून सुरु असलेला वाद अखेर प्रकाशकाच्या माफीनाम्याने संपुष्टात येणार आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - 'गांधी मला भेटला होता' या कवितेवर गेल्या २१ वर्षांपासून सुरु असलेला वाद अखेर प्रकाशकाच्या माफीनाम्याने संपुष्टात येणार आहे. व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिकार असला तरी त्यातून महापुरुषांचा अनादर करणे योग्य नाही असे सुनावत प्रकाशकांनी माफी मागावी असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.
१९९४ मध्ये बॅँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचा-यांसाठी प्रकाशित होणा-या एका मासिकात कवी वसंत गुर्जर यांची 'मला गांधी भेटला होता' ही कविता प्रकाशित करण्यात आली होती. या कवितेत कवीला महात्मा गांधीजी भेटतात अशी संकल्पना आहे. मात्र यात कवीने आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला होता. यावर काही संघटनांनी विरोध दर्शवत कोर्टात धाव घेतली. याप्रकरणी मासिकाचे संपादक व बँक कर्मचारी देवीदास तुळजापूरकर यांच्याविरोधात आयपीसीतील कलम २९२ अंतर्गत खटला सुरु होता. तब्बल २१ वर्षांनी तुळजापूर यांना अखेर सुप्रीम कोर्टाने दिलासा दिला आहे. कोर्टाने महापुरुषांचा अपमान करणे योग्य नाही असे सांगत प्रकाशकांना फटकारले. तसेच त्यांना माफी मागण्याचे आदेश देत खटला निकाली काढला.