पुजा-यांनी भक्त आणि देवाच्या मध्ये पडू नये - दिल्ली उच्च न्यायालय
By admin | Published: February 11, 2017 11:45 AM2017-02-11T11:45:08+5:302017-02-11T11:45:08+5:30
पुजारी देव आणि भक्तांच्या संवादात अडथळा आणू शकत नाहीत असं मत दिल्ली उच्च न्यायालयाने मांडलं आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 - पुजारी देव आणि भक्तांच्या संवादात अडथळा आणू शकत नाहीत असं मत दिल्ली उच्च न्यायालयाने मांडलं आहे. कालकाजी मंदिरात होणारी भक्तांची गर्दी हाताळण्यासंबंधी सुनावणी सुरु असताना न्यायालयाने हे मत मांडलं आहे.
न्यायाधीश जे आर मिढा यांनी हे निरीक्षण मांडलं असून, मंदिरातील कामकाज सुधारण्याची गरज असल्याचंही ते बोलले आहेत. 'हे अशाप्रकारे काम होऊ शकत नाही. ज्याप्रकारे मंदिराचा कारभार चालू आहे तो पाहता काळजी वाटत असल्याचंही', ते बोलले आहेत.
'आपल्या देवाचं दर्शन घेण्यासाठी व्यक्तीकडे काही सेकंदाचाच वेळ असतो. त्या तेवढ्याश्या वेळातही कोणी अडथळा आणता कामा नये. मी सुद्धा मंदिरात जातो. मंदिरातील पुजारी हे फक्त अडथळा आणण्यासाठीच असततात. लोकांना देवाशी संवाद साधण्यासाठी एक किंवा दोन सेकंद तरी द्या. मंदिरातील पुजारी जास्त ज्ञानी नसून भक्तापेक्षाही जास्त चांगल्या प्रकारे ते देवाशी संवाद साधू शकत नाहीत', असं न्यायाधीश जे आर मिढा बोलले आहेत.
पुजा-याने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलं आहे. पुजा-याने आपल्या दोन बहिणींना मंदिरात पूजा आणि सेवा करण्यापासून रोखण्यासाठी न्यायालयीन आदेश पास करण्याची मागणी केली होती.