महागाईचा भ़डका! सामान्यांच्या ताटातून गायब होऊ शकते डाळ; दरात तब्बल 16 टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 04:39 PM2022-04-06T16:39:02+5:302022-04-06T16:49:08+5:30
Pulses Price Hike : महागाईच्या सामना करणाऱ्या जनतेला सध्या तरी दिलासा मिळण्याची कोणतीच आशा दिसत नाही.
नवी दिल्ली - सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली असून महागाईचा आता भडका उडाला आहे. पेट्रोल, डिझेलसह आता साबण, कॉफी, मॅगीसह अनेक जीवनावश्यक असलेल्या वस्तुंचे भाव वाढत आहेत. महागाईचा सामना करणाऱ्या जनतेला सध्या तरी दिलासा मिळण्याची कोणतीच आशा दिसत नाही. कारण येणाऱ्या दिवसांत लोकांना आवश्यक असणाऱ्या सामानासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. सामान्यांच्या ताटातून डाळ गायब होऊ शकते. कारण डाळींच्या किंमतीत 16 टक्क्यांची वाढ झाली आहे.
आता डाळीचे दर वधारले आहेत. मागील जवळपास एका महिन्यात दाळीच्या दरात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे. डाळ, भाज्या, फळांसह खाण्या-पिण्याच्या अनेक गोष्टींच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर याचा मोठा परिणाम होणार आहे. देशात पेट्रोल - डिझेल दर वाढल्याने या खाद्यसामग्रीचे दर वाढले आहेत. त्याशिवाय शाळा, कॉलेज, हॉटेल, रेस्टोरंट ओपन झाल्याने याच्या मागणीतही वाढ झाली आहे.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र तूर डाळीच्या मोठ्या उत्पादकांपैकी एक आहेत. यंदा तूर डाळीचं उत्पादन 30 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काबूली चण्याचा भाव मागील महिन्यात 95 रुपये प्रति किलो होता, तो आता वाढून 110 रुपये प्रति किलोग्रॅम झाला आहे. चणे 5000 रुपये प्रति क्विंटल वरुन वाढून 5100 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत.
महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू आणि कर्नाटकात तूर डाळ 6,400 ते 6,500 रुपये प्रति क्विंटल विक्री होत आहे. हा दर आधी 6,300 रुपये प्रति क्विंटल होता. केवळ डाळच नाही तर फळं आणि इतर गोष्टींच्या किमतीही वाढल्या आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत फळांच्या किंमती वाढल्या आहेत. उन्हाळ्यात फळांची मागणी वाढली असून आवक कमी आहे. त्यामुळे किमतीही वाढ झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.