Pulwama Attack : 'सोशल मीडिया वॉरिअर बना', ब्रिगेडीअरचा नेटीझन्स सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 05:41 AM2019-02-17T05:41:51+5:302019-02-17T05:42:59+5:30

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

Pulwama Attack: Creating a Social Media Warrior, Brigadier Netizens Young People's Advice | Pulwama Attack : 'सोशल मीडिया वॉरिअर बना', ब्रिगेडीअरचा नेटीझन्स सल्ला

Pulwama Attack : 'सोशल मीडिया वॉरिअर बना', ब्रिगेडीअरचा नेटीझन्स सल्ला

Next

दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४९ जवान शहीद झाले आणि अवघा देश सुन्न झाला. याच अनुषंगाने ‘कसा करावा दहशतवादाचा बीमोड’ या विषयावर ‘लोकमत’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागविल्या होत्या. अवघ्या दोन दिवसांत पत्रांचा अक्षरक्ष: पाऊस पडला. यावरूनच देशवासीयांच्या तीव्र भावनांची कल्पना येते. या अमानवी हल्ल्याबाबत दु:ख व्यक्त करतानाच लोकांनी आपल्या मनातील संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. अनेक जणांनी पाकिस्तानचा बदला घ्या, दहशतवाद्यांना ठेचून काढा, असे म्हटले आहे. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक कोंडी करून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघडा पाडावा, असे काहींना वाटते. महत्त्वाचे म्हणजे, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही देताना, तेथे कर माझे जुळती... ही भावना सर्वांचीच आहे!


सोशल मीडिया वॉरिअर बना
दहशतवादाचा बीमोड करणे, हा दीर्घकालीन लढा आहे. जोपर्यंत पाकिस्तान आणि चीन ही दोन शत्रू राष्ट्रे दहशतवादाला फूस देत आहेत, तोपर्यंत दहशतवाद सुरूच राहणार. दहशतवादाचा सामना करताना तत्कालीक आणि दीर्घकालीन उपाय करावे लागतील. तत्कालीक कारवायांमध्ये तोफखाना, क्षेपणास्त्र, हवाई दल, सर्जिकल स्ट्राईक आणि शेवटचे हत्यार म्हणून पारंपरिक युद्ध. दीर्घकालीन कारवाईमध्ये मुत्सद्देगिरीच्या जोरावर पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून घोषित करायला हवे. जेणेकरून आर्थिक कोंडी होईल. घुसखोरांना पुढे करून पाकिस्तानी सैन्य मोकळे होत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याचा नायनाट आणि बीमोड हे उद्दिष्ट ठेवावे लागेल.

याशिवाय काश्मीरखोऱ्यातील उग्रवाद थांबविण्यासाठी सोशल मीडिया, मस्जिद-मदरसा या माध्यमातून होणारा दुष्प्रचार थांबवावा लागेल. कोणत्याही व्यासपीठावरून भारतविरोधी प्रचार खपवून घेतला जाणार नाही, अशी ठाम भूमिका घ्यावी लागेल. सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर होतो. यात वीस टक्के भारतातून तर उर्वरित भारताबाहेरून देशविरोधी प्रचार होतो. त्याला सर्वप्रथम आळा घालावा लागेल. आज भारताला सोशल मीडियाची नव्हेतर, सोशल मीडियाला भारताची आवश्यकता आहे. त्यातच या कंपन्यांचा नफा गुंतला आहे. त्यामुळे जगाच्या कोणत्याही कोपºयातून भारतविरोधी प्रचार खपवून घेणार नाही, हे सोशल मीडिया कंपन्यांना ठामपणे सांगावे लागेल. पुलवामानंतर अनेक ठिकाणी मेणबत्त्या जाळण्यात आल्या. त्याचा दहशतवाद्यांवर काहीच परिणाम होणार नाही, हे आधी लक्षात घ्यावे. त्यापेक्षा सोशल मीडियावर डोळे व कान उघडे ठेवून वावरावे. तिथे भारताविरोधात काही दिसले तर संबंधित यंत्रणांना सजग करावे. सोशल मीडिया वॉरिअर बनूनही आपण देशासाठी खूप काही करू शकतो.
- ब्रिगेडीअर हेमंत महाजन, पुणे

कराची, लाहोरपर्यंत धडक मारा
हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत असल्याने आता कराची, लाहोरपर्यंत घुसून पाकिस्तानला धडा शिकविण्याची हीच वेळ आहे. १९४७ साली भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत पाकिस्तानने जम्मू - काश्मिरवर हल्ला चढविला. त्यानंतर १९६५, १९७१ साली युध्द झाले. कारगील युद्धही पाकिस्तानने भारतावर लादले. आपले सैन्य भारतासोबत समोरासमोर युद्ध करू शकत नाही, हे लक्षात आल्याने पाकिस्तान दहशतवाद्यांमार्फत छुपे युद्ध करीत आहे. मुंबईतील दहशवादी हल्ला, उरी हल्ला, आणि आता पुलवामात झालेला भ्याड दहशतवादी हल्ला, हा त्याचाच एक भाग आहे. उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक करूनही पाकिस्तान सुधारला नाही, यामुळे आता पाकिस्तानवर थेट हल्ला करून लाहोर, कराची ताब्यात घेण्याची गरज आहे. त्यानंतर तो भूभाग सशर्त परत करावा आणी जगाला दाखवून द्यावे की, आम्हाला पाकिस्तानचा भूभाग नको तर त्याला कायमची अद्दल घडवायची आहे.
- रमेश सुर्वे, निवृत्त कॅप्टन, भारतीय सैन्यदल

सेनेला विशेषाधिकार द्या
जम्मू काश्मिरातील दहशतवाद हा धर्माशी जुळला आहे. हिंसा, जिहाद ही भावना तेथील मुलांमध्ये बालवयापासूनच शाळा, मदरशांतून पेरली जात आहे. त्यामुळे दहशतवादाचे मूळ नष्ट करायचे असेल तर मदरशांतून पेरली जाणारी जिहादाची भावना नष्ट केली पाहिजे. सोबतच मानवाधिकार हो दहशतवाद्यांना प्रोटेक्ट करणारे मोठे शस्त्र आहे. मानवाधिकारामुळे सेनेच्या अधिकारावर बंधन आले आहे. मीडियाने सुद्धा मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या वक्तव्यांवर कितपत प्रसिद्धी द्यावी, यावरही विचार करणे गरजेचे आहे. न्यायालयाचे निर्बंध, मानवाधिकाराचे कायदे यामुळे सेनेच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. राजकीय इच्छाशक्तीसुद्धा आवश्यक आहे. सेनेला विशेष अधिकार देण्याची गरज आहे.
- कॅप्टन दीपक लिमसे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, नागपूर

‘रोबोटिक टेक्नॉलॉजी’ वापरा
दहशतवाद्यांचे म्होरके जर त्यांच्याच पद्धतीने ठार केले तर अती उत्तम. ‘रोबोटिक टेक्नॉलॉजी’चा वापर करून जसे की ‘फ्लाईंग मशीन’ ‘रोबोटिक बर्ड’वर स्फोटक नेऊन गुपचूप म्होरक्या जवळ नेऊन ठार करायचे. सर्व म्होरक्या ना काही तासात कंठस्नान घातले पाहिजे एवढी खबरदारी घ्यावी. एक ‘रोबोटिक व्हेईकल’ तयार करावी. जवानांचा ताफा जातो त्यावेळी ‘रोबोटिक व्हेईकल’ पुढे एक आणि मागे एक अश्या प्रकारे राहील. हे एक रोबोट असल्याने दूरवरून कंट्रोल करता येते. हल्ला झालाच तर रोबोटिक गाडी नष्ट होईल आणि जवानांच्या प्राण वाचेल.
- निखिल अडसुळे, अलीपूर रोड, बार्शी, जि. सोलापूर

इस्रायल नीती
इस्रायलने दहशतवाद समूळ नष्ट केला आहे. त्यांचीच नीती वापरून आपण दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. भारतीय लष्कराला पूर्ण अधिकार देऊन या हल्ल्याला चोख उत्तर द्यावे.
- समशेर घनकर,
इयत्ता १० वी, परभणी

Web Title: Pulwama Attack: Creating a Social Media Warrior, Brigadier Netizens Young People's Advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.