पुलवामासारखा हल्ला उधळला, ५२ किलो स्फोटके जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:32 AM2020-09-18T03:32:02+5:302020-09-18T03:32:37+5:30
मागील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली कार अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर धडकवली होती. त्यात ४० जवान शहीद झाले होते.
नवी दिल्ली : पुलवामासारखा हल्ला करण्याचा कट भारतीय लष्कराने उधळला असून, गुरूवारी ५२ किलो स्फोटके जप्त केली आहेत. काश्मीरच्या करेवा भागातून ही स्फोटके जप्त करण्यात आली. ज्या ठिकाणी पुलवामा हल्ला झाला होता, त्यापासून आज स्फोटके सापडलेले ठिकाण केवळ ९ किलोमीटर अंतरावर आहे.
लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही पुलवामासारखा दुसरा हल्ला उधळून लावला आहे. पाण्याच्या एका टाकीमध्ये ही स्फोटके दडवून ठेवलेली होती. गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या झडतीमध्ये ती आढळली. यावेळी स्फोटकांची एकूण ४१६ पाकिटे सापडली. प्रत्येक पाकीट १२५ ग्रॅमचे आहे. त्याचबरोबर ५० डिटोनेटर्स अन्य एका टाकीत सापडले. ही स्फोटके सुपर-९० किंवा एस-९० या नावाने ओळखली जातात.
मागील वर्षी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली कार अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या वाहन ताफ्यावर धडकवली होती. त्यात ४० जवान शहीद झाले होते. पाकिस्तानस्थित जैश या अतिरेकी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. या हल्ल्याच्या १२ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून जैशचे प्रशिक्षण अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यानंतर दोन्ही देशांत कमालीचा तणाव निर्माण झाला. मागील महिन्यात एनआयएने आरोपपत्र दाखल करून या हल्ल्याचा कट कसा रचला गेला, याचा पर्दाफाश केला होता.
एनआयएने केला होता पर्दाफाश
पाकिस्तानस्थित जैश या अतिरेकी संघटनेने पुलवामा येथील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.
मागील महिन्यात एनआयएने आरोपपत्र दाखल करून जैशने केलेल्या या हल्ल्याचा कट कसा रचला गेला, याचा पर्दाफाश केला होता.