Pulwama Attack : रुग्णालयातून हलविली मसूद अजहरने सूत्रे; काश्मीरमध्ये जैशचे ६० दहशतवादी सक्रिय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 06:52 AM2019-02-18T06:52:10+5:302019-02-18T06:52:51+5:30
पाकिस्तानातील जिहादी गटांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड जिहाद कौन्सिल (यूजेसी)च्या मागील सहा बैठकांना अजहर आजारपणामुळे हजर राहू शकलेला नव्हता.
श्रीनगर : जैश-ए-मोहम्मद (जेइएम)चा प्रमुख मसूद अजहर हा रावळपिंडी येथील लष्करी रुग्णालयात दाखल असून तिथून त्याने पुलवामा हल्ल्याची सूत्रे हलविली अशी माहिती आता उजेडात आली आहे. आजारपणामुळे गेल्या चार महिन्यांपासून तो रुग्णालयात उपचार घेत आहे.
पाकिस्तानातील जिहादी गटांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड जिहाद कौन्सिल (यूजेसी)च्या मागील सहा बैठकांना अजहर आजारपणामुळे हजर राहू शकलेला नव्हता. पुलवामा हल्ल्याच्या आठ दिवस आधी आपल्या हस्तकांसाठी त्याने एक ध्वनिमुद्रित संदेश पाठविला होता. त्यात म्हटले होते की, या युद्धात मरण येण्याइतकी भाग्यदायी गोष्ट दुसरी कोणतीही नाही. भारताविरोधात आपण करत असलेल्या कारवायांना कोणी देशद्रोही कृत्ये म्हणतील, देशातील शांततेला धोका असल्याचाही प्रचार होईल, पण त्याकडे दुर्लक्ष करा.
हल्ल्याची माहिती मसूदने यूजेसीच्या अन्य सदस्यांनाही कळू दिली नव्हती. अजहरचा ध्वनिमुद्र्रित संदेश ऐकवून त्याचा भाचा मोहम्मद
उमैर व अब्दुल रशीद
गाझी काश्मीरमधील तरुणांची माथी भडकवत होते. त्यांना आत्मघाती हल्ले करण्यासाठी प्रवृत्त करत होते.
सध्या काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदचे ६० दहशतवादी सक्रिय असून त्यातील ३५ जण पाकिस्तानी व बाकीचे स्थानिक आहेत.