म्हणे, भारतानेच दहशतवाद पोसला, आमच्यावर युद्धही लादलं; पाकिस्तानी लष्कराचा कांगावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 04:16 PM2019-02-22T16:16:12+5:302019-02-22T16:34:11+5:30
पुलवामातील हल्ल्यात आमचा हात नाही; पाकिस्तानी लष्करानं हात झटकले
नवी दिल्ली: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन आमच्यावर बेछूट आरोप केले जात आहेत. या हल्ल्याशी आमचा कोणताही संबंध नाही, असा दावा करत पाकिस्तानी लष्करानं हात झटकले आहेत. भारतानंच दहशतवाद पोसला. पाकिस्तानवर युद्ध लादलं. भारतात निवडणुका असतात, त्याचवेळी दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानात महत्त्वाचे कार्यक्रम सुरू असतात, त्यावेळी भारताकडून दबाव आणला जातो, अशा उलट्या बोंबादेखील पाकिस्तानी लष्करानं मारल्या. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी आज पत्रकार परिषद घेतली.
पुलवामातील दहशतवादी हल्ल्यावरुन भारतानं आमच्यावर बेछूट आरोप केले. कोणत्याही पुराव्यांशिवाय आरोप केले गेले. त्या आरोपांची चौकशी आमच्याकडून पूर्ण करण्यात आली. त्यामुळेच आम्हाला उत्तर देण्यास उशीर झाला, असं स्पष्टीकरण पाकिस्तानी लष्करानं दिलं. पुलवामा हल्ल्यासाठी भारतच जबाबदार असल्याचा जावईशोध पाकिस्ताननं लावला. 'पुलवामातील ज्या ठिकाणी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला, ते ठिकाण नियंत्रण रेषेपासून खूप दूर आहे. त्यामुळे पाकिस्तानातील एखादी व्यक्ती तिथंपर्यंत पोहोचणं शक्य नाही. त्यामुळे या हल्ल्याला पाकिस्तान जबाबदार कसा?', असा प्रश्न पाकिस्तानी लष्करानं उपस्थित केला.
Major General Asif Ghafoor,DG ISPR,Pakistan Army on talks in India that Pakistan is preparing for war: We're not preparing for war. It's you(India) who is sending war threats. We're not preparing for initiating a war but we've a right to respond to the war threats from your side pic.twitter.com/INfcG5KfrM
— ANI (@ANI) February 22, 2019
पुलवामातील हल्ल्यासाठी पाकिस्तानी लष्करानं अप्रत्यक्षपणे भारतीय सैन्यालाच जबाबदार धरलं. 'काश्मीरमध्ये जवानांचा कडक पहारा असतो. त्या भागात सर्वसामान्य जनतेपेक्षा लष्कराच्या जवानांची संख्या जास्त आहे. सत्तर वर्षांपासून भारतीय सैन्य तिथे आहे. तिथे जर पाकिस्तानी व्यक्ती पोहोचली असा भारताचा दावा असेल, तर मग सुरक्षेत काहीतरी चूक झाली असेल,' असं म्हणत गफूर यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न केला. 'पुलवामा हल्ला ज्यानं घडवला, तो तरुण काश्मीरचाच रहिवासी आहे. त्याला भारतीय सैन्यानं वाईट वागणूक दिली होती, अशा बातम्या सोशल मीडियावर आल्या आहेत. सैन्यानं दिलेल्या वर्तणुकीचा राग मनात धरुन त्यानं हा हल्ला केला असावा,' असा दावा पाकिस्तानी लष्करानं केला.
भारताकडून दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन दिलं जात असल्याचा आरोपदेखील पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला. 'भारतात ज्यावेळी निवडणुका येतात, त्यावेळी दहशतवादी हल्ले होतात. पाकिस्तानात महत्त्वाचे कार्यक्रम सुरू असतात, नेमका त्याचवेळी भारताकडून दबाव आणला जातो. ज्यावेळी संवाद सुरू असतो, संबंध सुधारण्याची प्रक्रिया सुरू असते, त्याचवेळी भारतात दहशतवादी कारवाया होतात,' असं अजब तर्कट पाकिस्तानी लष्करानं मांडलं. '2001 मध्ये भारताच्या संसदेवर हल्ला झाला. त्याच्या पुढच्या वर्षी पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुका होत्या. 2008 मध्ये मुंबईवर हल्ला झाला. 2009 मध्ये भारतात निवडणूक होती. आता भारतात लोकसभेची निवडणूक होऊ घातली आहे. नेमक्या त्याचवेळी पुलवामात हल्ला झाला,' असं म्हणत पाकिस्तानी लष्करानं भारतालाच दहशतवादी हल्ल्यांसाठी जबाबदार धरलं.