Pulwama Attack: स्फोट घडवण्यात तरबेज अब्दुल रशीद गाझी याच्यामुळेच झाला दहशतवादी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 06:05 AM2019-02-16T06:05:58+5:302019-02-16T06:10:02+5:30
सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय असून, त्यानेच हल्ल्याचा कट रचण्यापासून तो अमलात आणण्याची योजना आखली होती, असे स्पष्ट झाले आहे.
श्रीनगर : सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रशीद गाझी हा जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा निकटवर्तीय असून, त्यानेच हल्ल्याचा कट रचण्यापासून तो अमलात आणण्याची योजना आखली होती, असे स्पष्ट झाले आहे. तो मूळचा अफगाणिस्तानातील असून, मसूद अझहर यानेच अमेरिकी सैन्याविरोधी कारवायांसाठी अब्दुल रशीदला तेथे पाठवले होते.
काही महिन्यांपूर्वी मसूद अझहरचा पुतण्या व भाचा यांचा सुरक्षा दलांनी काश्मीरमधील चकमकीत खात्मा केला होता. त्याचा बदला घेण्यासाठी मसूद अझहर याने अब्दुल रशीदला काश्मीरमध्ये पाठवले. तो आयईडीद्वारे स्फोट घडवण्यातील तरबेज आहे. अब्दुल रशीद ९ डिसेंबर रोजी काश्मीरमध्ये घुसला आणि तेव्हापासून तो अद्याप काश्मीरमध्ये असल्याची गुप्तचरांची माहिती आहे.
अब्दुल रशीद गाझी हा ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दहशतवाद्यांच्या पाकव्याप्त काश्मीरमधील प्रशिक्षण तळाचा काही
काळ प्रमुख होता. काश्मीर खोऱ्यातील तरुणांना तिथे प्रशिक्षण दिले जात असे. त्यानेच आदिल दार याला सहा महिन्यांपूर्वी स्फोटके हाताळण्याचे आणि स्फोट घडवून आणण्याचे प्रशिक्षण पाकव्याप्त काश्मीरमध्ये दिल्याचे सांगण्यात येते. काश्मीरमध्ये आल्यावर पुन्हा त्याने आदिल दारशी संपर्क साधला आणि त्याच्यामार्फत गुरुवारच्या हल्ल्याची योजना पूर्णत्वास नेली.
- सीआरपीएफच्या जवानांमध्ये गोंधळ उडवून देणे, हाच त्यामागील हेतू होता. किमान ५ ते ६ दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला, असे उघड झाले आहे. स्फोटामुळे एक बस पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर काही बसेसचे बरेच नुकसान झाले. शिवाय काही बसेसवर गोळीबाराच्या खुणाही दिसून आल्या. मात्र स्फोटानंतरच्या गोंधळात दहशतवादी पळून गेले. त्यांचाही शोध सुरू आहे.