पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 7 जण ताब्यात, 'हा' असू शकतो मास्टरमाइंड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 03:54 PM2019-02-16T15:54:27+5:302019-02-16T16:21:50+5:30
पुलवाम्यात दहशतवादी हल्ल्यात भारतमातेचे 40 जवान शहीद आहे.
नवी दिल्ली- पुलवाम्यात दहशतवादी हल्ल्यात भारतमातेचे 40 जवान शहीद आहे. त्यानंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी सात लोकांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतीपुरा जिल्ह्यांतील असून, त्यांच्यावर पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्याला मदत केल्याचा संशय आहे.
हल्ल्याची योजना 'जैश-ए-मोहम्मद'चा पाकिस्तानी म्होरक्या कामरान याने केल्याचा संशय असून, तो पुलवामा, अवंतीपुरा अन् त्राल या भागात सक्रिय आहे. त्राल जवळच्या मिदुरा येथून या हल्ल्याचा कट शिजल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटके पुरवणाऱ्या दहशतवाद्याचा पोलीस शोध घेत आहेत.
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदनं काश्मीरमध्ये गुरुवारी (14 फेब्रुवारी) हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात भारत मातेचे 40 जवान शहीद झालेत. केंद्रीय राखीव दलाचे जवान दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले. शहीद जवानांमध्ये कोणाचा तरी भाऊ, कोणाचा पती आणि कोणाच्या तरी मुलाचाही समावेश आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आलं. यामध्ये आसाम (1), बिहार (2), हिमाचल प्रदेश (1), जम्मू-काश्मीर (1), झारखंड (1), कर्नाटक (1), केरळ (1), मध्य प्रदेश (1), महाराष्ट्र (2), ओदिशा (2), पंजाब (4), राजस्थान (5), तमिळनाडू (1), उत्तर प्रदेश (12), उत्तराखंड (2), पश्चिम बंगाल (1) या राज्यांमधील शहिदांचा समावेश आहे. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारनं जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटकं असल्यानं बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला.