Pulwama Attack: पाकिस्तानी गायकांविरोधात मनसेचा 'सूर'; यूट्युबवरुन टी सीरिजनं गाणी हटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 03:34 PM2019-02-17T15:34:49+5:302019-02-17T15:46:38+5:30
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसे आक्रमक
मुंबई: पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. जवानांच्या बलिदानाचा बदला घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मोदी सरकारनं पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी सुरू केली आहे. यानंतर आता पाकिस्तानी कलाकारांना मनसेनं दणका दिला आहे. पाकिस्तानी गायकांची गाणी त्वरित यूट्युबवरुन हटवा, असा इशारा मनसेनं म्युझिक कंपन्यांना दिला आहे. यानंतर टी सीरिजनं पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली.
पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवा, असा सज्जड दम मनसेनं दिला होता. याशिवाय पाकिस्तानी गायकांसोबत काम करणं बंद करा, असा इशारादेखील दिला. 'आम्ही टी-सीरिज, सोनी म्युझिक, व्हिनस, टिप्स म्युझिक यासारख्या कंपन्यांना पाकिस्तानी गायकांसोबत काम करु नका, असं सांगितलं आहे. त्यामुळे या कंपन्यांनी त्वरित पाकिस्तानी गायकांसोबत काम करणं थांबवावं. अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं कारवाई करू,' असा धमकीवजा इशारा मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी दिला. आम्ही दिलेल्या इशाऱ्यानंतर टी सीरिजनं त्यांच्या यूट्युब चॅनेलवरुन पाकिस्तानी गायकांची गाणी हटवल्याचं त्यांनी सांगितलं.
काही दिवसांपूर्वीच भूषण कुमार यांच्या टी सीरिजनं वेगवेगळ्या गाण्यांसाठी राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम यांच्यासोबत करार केले होते. मात्र मनसेच्या इशाऱ्यानंतर टी-सीरिजनं लगेच पाकिस्तानी गायकांची गाणी यूट्युबवरुन हटवली. याआधी 2016 साली उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यावेळीही मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून जाण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती.