पम्पोर हल्ला, दुसऱ्या दिवशीही चकमक सुरूच
By admin | Published: October 12, 2016 05:54 AM2016-10-12T05:54:54+5:302016-10-12T05:54:54+5:30
पम्पोरमधील एका सरकारी इमारतीत दडून बसलेले अतिरेकी आणि सुरक्षा दलांतील चकमक मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू असून,
श्रीनगर : पम्पोरमधील एका सरकारी इमारतीत दडून बसलेले अतिरेकी आणि सुरक्षा दलांतील चकमक मंगळवारी दुसऱ्या दिवशीही सुरू असून, जवानांनी दहशतवाद्यांविरुद्धची मोहीम तीव्र केली आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्रान घालण्यात यश आले आहे.
उद्योजकता विकास संस्थेजवळील (ईडीआय) परिसर रिकामा करण्यात आला असून, दोन्ही बाजूंकडून तुफान गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी सुरक्षा दलांनी आज सकाळपासून हल्ले तीव्र केले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. प्रारंभीच्या गोळीबारात लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. (वृत्तसंस्था)
पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करण्यास वाजपेयींनी रोखले होते-
पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून १९९९ मध्ये भारताने कारवाई करण्याची पूर्ण तयारी केली होती परंतु आंतरराष्ट्रीय दडपणामुळे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ती थांबविली, अशी माहिती लष्कर प्रमुख (निवृत्त) वेदप्रकाश मलिक यांनी दिली. गेल्या महिन्यात भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या लक्ष्यभेदी कारवाईचे (सर्जिकल स्ट्राईक्स) मलिक यांनी पूर्ण समर्थन केले. कारगिलचे युद्ध झाल्यावर भारत पाकव्याप्त काश्मीरमध्ये कारवाई करणार होता व त्यावेळी मलिक लष्कर प्रमुख होते.
गस्ती पथकावर हल्ला, ९ जखमी -
काश्मिरात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी मंगळवारी ग्रेनेड हल्ला केला. शोपिया जिल्ह्यातील या घटनेत २ सुरक्षा कर्मचाऱ्यांसह ९ जण जखमी झाले. सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी शोपिया शहरात सीआरपीएफ अधिकाऱ्यांवर ग्रेनेड फेकण्यात आला. यात सात नागरिक आणि दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.
श्रीनगरच्या अनेक भागांत संचारबंदी-
निदर्शनांदरम्यान छर्रे लागून अल्पवयीन मुलाचा मृत्यू होण्यास चार दिवस उलटल्यानंतरही कायदा
व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी श्रीनगरच्या काही भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आली. पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. १२ वर्षांच्या जुनैद आखूनला सैदपूर येथे छर्रे लागले होते. सौरा येथील रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला चार दिवस उलटल्यानंतरही नौहट्टा, खानयार, रैनावाडी, सफकदाल आणि महाराजगंज आदी भागात संचारबंदी सुरू आहे. शहराच्या इतर भागात मोहर्रममुळे संचारबंदी लागू करण्यात आली होती. तथापि, तेथील निर्बंध आता उठविण्यात आले आहेत.