Pune: पुण्यातील शाळेचे दोन मजले सील, ‘पीएफआय’ विरुद्ध चौकशी, युवकांच्या कट्टरपंथींसाठी वापराचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 10:22 AM2023-04-18T10:22:47+5:302023-04-18T10:23:07+5:30
Pune: राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी महाराष्ट्रातील पुण्यातील एका शाळेच्या इमारतीचे दोन मजले सील केले आहेत.
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) सोमवारी महाराष्ट्रातील पुण्यातील एका शाळेच्या इमारतीचे दोन मजले सील केले आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेने एका समुदायाच्या नेत्यांच्या हत्या करण्यासाठी मुस्लीम युवकांचे कट्टरपंथीकरण करण्याच्या हेतूने त्याचा वापर केल्याचा दावा एनआयएने केला आहे.
एनआयएतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, ब्लू बेल स्कूलचा चौथा आणि पाचवा मजला रविवारी सील करण्यात आला. पीएफआय निरपराध मुस्लीम तरुणांना संघटनेत भरती करत आहे आणि २०४७ पर्यंत देशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्यास विरोध करणाऱ्यांवर हल्ला करून त्यांना संपविण्याचे प्रशिक्षण देखील देत आहे.
एनआयए, इतर केंद्रीय तपास यंत्रणा आणि राज्य पोलिस विभागांनी छापे टाकून अनेक पीएफआय कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर संघटना बेकायदा घोषित केल्यानंतर केंद्र सरकारने गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये पीएफआयवर बंदी घातली होती.
बेकायदा घडामोडी प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार पुण्यात कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई गेल्यावर्षी एप्रिलमध्ये पीएफआयविरुद्ध दाखल करण्यात आलेला गुन्हा आणि यावर्षी मार्चमध्ये दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्राशी संबंधित आहे. त्यात एनआयएने पीएफआयसह २० संघटनांचे नाव घेतले होते.
नव्याने भरती झालेल्या पीएफआय सदस्यांना भारतात इस्लामिक शासन स्थापन करण्याच्या संघटनेच्या विचारसरणीला विरोध करणाऱ्या प्रमुख नेत्यांवर हल्ला करून त्यांना मारण्यासाठी चाकू, विळा यांसारखी धोकादायक शस्त्रे पुरवली गेली होती. शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते, असा दावाही एनआयएने केला आहे.
शस्त्र प्रशिक्षणासाठी जागेचा वापर
“एनआयएने गेल्यावर्षी २२ सप्टेंबर रोजी शाळेच्या आवारातील दोन मजल्यांची झडती घेतली होती. त्यावेळी तपास यंत्रणेने काही दस्तऐवज जप्त केले होते, ज्यावरून दिसून आले की, या मालमत्तेचा वापर पीएफआयशी संबंधित आरोपींनी त्यांच्या सदस्यांसाठी शस्त्र प्रशिक्षणासाठी केला होता.