"आता एकच संदेश, शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या अन्..."; संयुक्त किसान मोर्चाचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 09:14 AM2022-02-07T09:14:10+5:302022-02-07T09:17:28+5:30
Rakesh Tikait And Modi Government : योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी परिषद घेत संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच भाजपाला शेतकरी विरोधी म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांनी मेरठमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. हन्नान मोल्ला, योगेंद्र यादव आणि राकेश टिकैत यांनी परिषद घेत संयुक्त किसान मोर्चाची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच भाजपालाशेतकरी विरोधी म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकरी विरोधी भाजपा विरोधात मतदान करून त्यांना शिक्षा द्या, असं आवाहन केलं आहे. योगेंद्र यादव यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "क्रांतीचं ठिकाण असलेल्या मेरठमध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाबाबत हन्नान मोल्ला आणि राकेश टिकैत यांच्यासोबत माध्यमांशी संवाद साधला. यात एकच संदेश आहे की शेतकरी विरोधी भाजपाला शिक्षा द्या" असं म्हटलं आहे.
राकेश टिकैत यांनी "पश्चिम उत्तर प्रदेशला विकासाची चर्चा करायची आहे. हिंदू, मुस्लीम, जिन्ना, धर्माच्या गोष्टी करणाऱ्यांना मतांचं नुकसान होईल. मुझफ्फरनगर हिंदू-मुस्लीम सामन्याचं मैदान (स्टेडियम) नाही, देशाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांचं नावही घेत नाहीत. आजपर्यंत पंतप्रधानांनी आंदोलना दरम्यान जीव गेलेल्या शेतकऱ्यांना शहीद म्हणणं टाळलं आहे. त्यांच्या उमेदवारांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारायला हवेत" असं आवाहन टिकैत यांनी केलं आहे.
"भाजपाने आपली आश्वासनं पाळली नाहीत"
संयुक्त किसान मोर्चाने याआधी 4 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशच्या नागरिकांना भाजपाला शिक्षा देण्याचं आवाहन केलं होतं. भाजपाने आपली आश्वासनं पाळली नाहीत. त्यामुळे नागरिकांनी त्यांना शिक्षा द्यावी, असं म्हटलं होतं. शेतीमालाला हमीभावावर समिती स्थापन करणे आणि शेतकऱ्यांविरोधातील प्रकरणे मागे घेण्यासह अनेक मागण्या अपूर्ण असल्याचं शेतकरी नेत्यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीपासून मतदान होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 10 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात 58 जागांसाठी मतदान होईल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"कोरोनाच्या संकटात मोदींनी शेतकऱ्यांना वर्षभर रस्त्यावर सोडलं"
काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) हे विविध मुद्द्यांवरून भाजपा (BJP) आणि मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल करत असतात. आता पुन्हा एकदा राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. "भारतात आज पंतप्रधान नसून एक असा राजा आहे, ज्याला वाटतं की तो निर्णय घेत असताना लोकांनी शांत बसावं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. तसेच पंतप्रधान मोदींवर कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांना एक वर्षभर रस्त्यावर सोडल्याचा गंभीर आरोपही केला आणि काँग्रेस असं कधीच करणार नाही, असं देखील म्हणाले आहेत. तसेच मोदी सरकारने जशी वागणूक दिली तसा त्यांचा पक्ष शेतकर्यांशी कधीही वागणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले.