एखाद्याच्या प्रेमात पडल्याबद्दल त्याला शिक्षा देणं हा गुन्हा; सुप्रीम कोर्टाचं स्पष्ट मत
By मोरेश्वर येरम | Published: January 7, 2021 02:11 PM2021-01-07T14:11:57+5:302021-01-07T14:15:33+5:30
एका खटल्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काही महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत.
नवी दिल्ली
एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडल्यामुळे किंवा एकमेकांचा सहवास लाभण्याची इच्छा व्यक्त केल्याबद्दल त्यांना शिक्षा देणं हा कायद्यानं गुन्हा आहे, असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं आहे.
एका खटल्याचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काही महत्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत. "तुम्ही एखाद्याला प्रेमात पडल्याबद्दल शिक्षा करू शकत नाही", असं शरद बोबडे म्हणाले. तशी शिक्षा केल्यास तो गंभीर स्वरुपाचा गुन्हा ठरेल, असंही ते पुढे म्हणाले.
सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय घटनापीठासमोर आज एका गावातील खाप पंचायतीमधील ११ सदस्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी झाली. एका गावातील एक दलित तरुण तरुणीसोबत पळून गेला होता आणि त्यांना पळून जाण्यास तरुणाच्या चुलतभावाने मदत केली होती. या तिघांनाही फाशी देण्याचा धक्कादायक प्रकार गावातील पंचायत सदस्यांनी केला होता. या प्रकरणावरील सुनावणीत न्यायाधीशांनी सर्व आरोपींना झापलं.
पळून गेलेल्या तरुण आणि तरुणीने काही दिवसांनी गावात परतण्याचा निर्णय घेतला होता. गावकरी शांत झाले असतील असा त्यांचा समज होता. पण ते गावात परतल्यानंतर दोघांनाही मारहाण करण्यात आली. तर दोघांना मदत करणाऱ्या चुलत भावालाही गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर या तिघांनीही गावतीला एका झाडाला टांगून फाशी देण्यात आली होती.
उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील मेहराना गावात १९९१ साली ही घटना घडली होती. या प्रकरणात ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील ८ जणांना अलहाबाद कोर्टाने २०१६ साली फाशीची शिक्षा सुनावली. तर इतरांना आजीवन तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे.