मुस्लीम असल्याची मिळतेय शिक्षा; आजम खान समाजवादी पक्षावर नाराज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2020 11:25 AM2020-03-03T11:25:08+5:302020-03-03T12:00:14+5:30
आजम खान एवढे नाराज आहेत की, त्यांनी कारागृहात भेटीसाठी आलेल्या सपा नेत्यांची भेट घेणे टाळल्याचे अहमद यांनी सांगितले.
नवी दिल्ली - समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते आजम खान आणि त्यांचा मुलगा अब्दुल्ला यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत सीतापूर कारागृहातून रामपूर न्यायालयात हजर करण्यात आले. आजम खान यांना पत्नी आणि मुलासह सीतापूर कारागृहात पाठविण्यासंदर्भात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी आजम यांचे साले जमीर अहमद यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी आजम खान समाजवादी पक्षावर नाराज असल्याचे अहमद यानी म्हटले. तसेच मुस्लीम असल्याची शिक्षा मिळत असल्याची भावना आजम खान यांची झाल्याचे त्यांनी सांगितले.
आजम खान यांना सीतापूर कारागृहात पाठविण्यावरून त्यांच्या वकिलाने आक्षेप घेतला होता. यावर 29 फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली. तर सुनावणीची पुढची तारिख 3 मार्च देण्यात आली होती. तत्पूर्वी कोर्टातून आदेश मिळाल्यानंतर आजम खान पत्नी आणि मुलासह पोलिसांना शरण गेले होते.
दरम्यान समाजवादी पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना आजम खान यांची आहे. तसेच केवळ मुस्लीम असल्यामुळे भाजपकडून आपल्याला टार्गेट करण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आजम यांचे साले जमीर अहमद म्हणाले की, भाजप सरकारकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत असताना समाजवादी पक्ष त्यांच्या पाठिशी उभा राहिला नाही. यामुळे ते पक्षावर नाराज आहेत.
दरम्यान आजम खान एवढे नाराज आहेत की, त्यांनी कारागृहात भेटीसाठी आलेल्या सपा नेत्यांची भेट घेणे टाळल्याचे अहमद यांनी सांगितले.