काळ्यापाण्याची शिक्षा; उत्तर भारतातील कुख्यात गुंडांना अंदमानच्या तुरुंगात शिफ्ट केले जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 01:30 PM2023-07-02T13:30:48+5:302023-07-02T13:31:31+5:30
NIA आणि गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये याबाबत दीर्घ चर्चाही झाली आहे.
उत्तर भारतातील विविध तुरुंगात कैद असलेल्या 10-12 कुख्यात गुंडांना अंदमान आणि निकोबार तुरुंगात पाठवण्याचे आवाहन राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) गृह मंत्रालयाला केले आहे. या मुद्द्यावर गृह मंत्रालयाचे अधिकारी आणि एनआयएचे अधिकारी यांच्यात दीर्घकाळ चर्चाही झाली. NIA ने गृह मंत्रालयाच्या अधिकार्यांना काही निवडक कैद्यांना अंदमान आणि निकोबार तुरुंगात स्थानांतरित करण्यास सांगितले आहे.
अंदमान निकोबारमध्ये तुरुंगवासाची शिक्षा अत्यंत कठोर मानली जाते. याला काळ्यापाण्याची शिक्षा, असेही म्हणतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएला दिल्ली, पंजाब आणि हरियाणाच्या तुरुंगात कैद असलेल्या अशा गुंडांना अंदमानच्या तुरुंगात पाठवायचे आहे, जे इथल्या तुरुंगात राहून त्यांची टोळी चालवत आहेत. या गुंडांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणे, हे एनआयएचे उद्दिष्ट आहे.
रिपोर्टनुसार, एनआयए काही गुंडांना आसाममधील दिब्रुगढ सेंट्रल जेलमध्येही पाठवण्याच्या पर्यायावर विचार करत आहे. तिथे सध्या खलिस्तानी संघटना वारिस पंजाब दे प्रमुख अमृतपाल सिंग आणि त्याचे सहकारी कैद आहेत. अमृतपाल पंजाबमधील अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहे.
यामुळे अंदमानचा पर्याय निवडला
गृह मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, सुरुवातीला कुख्यात गुंडांना दक्षिण भारतातील तुरुंगात पाठवण्याचा होता, परंतु त्या राज्य सरकारांकडून परवानगी घ्यावी लागणार असल्याने ही प्रक्रिया लांबलचक होती. अंदमान आणि निकोबार हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे तिथे या गुंडांना हलवण्यासाठी केंद्राला कोणाचीही वेगळी परवानगी घ्यावी लागणार नाही.
कारागृहात रचले जातात कट
दिल्लीच्या तुरुंगात कैद असलेल्या गुंडांमध्ये परस्पर टोळीयुद्धाचा धोका वाढला आहे. मे महिन्यात गुंड टिल्लू ताजपुरियाच्या हत्येनंतर दिल्लीच्या तिहार तुरुंगानेही गृहमंत्रालयाला पत्र लिहून कुख्यात गुंडांना दिल्लीच्या तुरुंगातून इतर राज्यांच्या तुरुंगात हलवण्याची विनंती केली होती. सध्या तिहार तुरुंगात 16 अंतर्गत तुरुंग आहेत. यामध्ये कैदी ठेवण्याची क्षमता 10,500 आहे, पण प्रत्यक्षात इथे 20,000 पेक्षा जास्त कैदी आहेत. यातील अनेक कैदी कुप्रसिद्ध आहेत.