सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा; सुवर्ण मंदिरातील शौचालय आणि भांडी साफ करण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 06:28 PM2024-12-02T18:28:04+5:302024-12-02T18:29:29+5:30
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दल पक्षाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल यांना अखाल तख्तने धार्मिक शिक्षा सुनावली आहे.
Punjab Sukhbir Singh Badal : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना अखाल तख्तने(शीख धर्मातील सर्वोच्च समिती) धार्मिक शिक्षा सुनावली आहे. 2015 मध्ये तत्कालीन अकाली सरकारच्या काळात सरकारकडून झालेल्या चुकांची कबुली दिल्यानंतर अखाल तख्तने सोमवारी(दि.2) बादल यांच्यासह तत्कालीन सरकारमधील मंत्र्यांना अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील शौचालय साफ करणे, लंगरमध्ये सेवा देणे आणि भांडी धुण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिन्यांपूर्वीच सुखबीर सिंह बादल यांना अकाल तख्तने 'तनखैय्या' (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित केले होते. त्यानंतर आता आज अकाल तख्त येथे पाच सिंग साहिबांची बैठक झाली, ज्यामध्ये बादल यांच्यासह अकाली सरकारच्या काळातील मंत्रिमंडळ सदस्यांनाही धार्मिक गैरवर्तनाच्या आरोपाखाली शिक्षा सुनावण्यात आली आहे. याशिवाय, अकाल तख्तचे जथेदार ग्यानी रघुबीर सिंह यांनी शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सुखबीर बादल यांचा राजीनामा तीन दिवसांत स्वीकारुन अकाल तख्त साहिबला अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शिरोमणी अकाली दलाच्या कार्यकारिणीला सदस्यत्व मोहीम सुरू करून सहा महिन्यांत नवीन अध्यक्ष निवडण्याचे निर्देश दिले आहेत.
VIDEO | Five high priests headed by Akal Takht Jathedar Giani Raghbir Singh pronounce punishment for former Punjab deputy CM Sukhbir Singh Badal for religious misconduct.
— Press Trust of India (@PTI_News) December 2, 2024
On August 30, Sukhbir was declared ‘tankhaiya’ by Akal Takht, which held him guilty of religious misconduct… pic.twitter.com/MwPKXI1OS3
प्रकाशसिंग बादल यांची 'फकर-ए-कौम' पदवी काढून घेतले
अकाली सरकारच्या काळात वादग्रस्त धर्मगुरू डेरा प्रमुख गुरमीत राम रहीम याला देण्यात आलेली माफी लक्षात घेऊन अकाल तख्तने माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांना दिलेली 'फकर-ए-कौम' पदवी परत घेतली आहे. 2007 मध्ये सलाबतपुरा येथे डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम याने गुरू गोविंद सिंग यांच्यासारखे कपडे घालून अमृत शिंपडण्याचे नाटक केले होते. याप्रकरणी राम रहीनविरुद्ध पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पण राम रहीमला शिक्षा होण्याऐवजी अकाली सरकारने त्याच्यावर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले.
सुखबीर सिंग बादल यांच्यावरील आरोप
सरकारमधील जातीय मुद्द्यांवरुन लक्ष वळवणे
शीख तरुणांवर अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यांना बढती देणे
राम रहीमवर दाखल झालेला गुन्हा मागे घेणे
जथेदारांना चंदीगड येथील निवासस्थानी बोलावून राम रहीमला माफ करण्यास सांगणे
पवित्र प्रतिमांची चोरी आणि विटंबनाच्या प्रकरणांचा तपास न करणे
संगतांवर लाठीचार्ज आणि गोळीबार करणे
तरुणांवरील अत्याचाराच्या चौकशीसाठी कोणतीही समिती स्थापन न करणे