आप नेत्यावर हल्ला करुन पत्नीची निर्घृण हत्या; पोलिसांच्या चौकशीत समोर आलं हादरवणारं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 18:00 IST2025-02-17T17:42:26+5:302025-02-17T18:00:15+5:30
पंजाबमध्ये आप नेत्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला झाला असून त्यात पत्नीचा मृत्यू झाला.

आप नेत्यावर हल्ला करुन पत्नीची निर्घृण हत्या; पोलिसांच्या चौकशीत समोर आलं हादरवणारं सत्य
Punjab Crime: पंजाबच्या लुधियानामध्ये आम आदमी पार्टीच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. आप नेते अनोक मित्तल आणि त्यांची पत्नी मानवी यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा लुधियानाच्या डेहलॉन भागात दरोडेखोरांच्या एका गटाने धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात मानवी मित्तल यांचा मृत्यू झाला. मानवी यांच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मित्तल दाम्पत्याची कार आणि मानवी यांनी घातलेले दागिने घेऊन दरोडेखोर पळून गेले. उद्योगपती अनोक मित्तल यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आता या प्रकरणात वेगळाच खुलासा झाला आहे.
अनोक मित्तलने पोलिसांना सांगितले की, "रात्री मी पत्नीसह डेहलों-मालेरकोटला मार्गावरील पोहीरजवळील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करून लुधियानाला परतत होतो. त्यावेळी डेहलोन बायपास जवळील बाथरूमजवळ कार थांबवली. त्यावेळी मागून आलेल्या वाहनातून ५ ते ६ जणांनी खाली उतरून माझ्या पायावर लोखंडी रॉडने वार केले व नंतर तोंड कापडाने बांधले ज्यामुळे मी बेशुद्ध झालो."
"१५-२० मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर पाहिले की कार तिथे नव्हती आणि पत्नी गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडली होती. तिच्या अंगावर धारदार शस्त्राच्या खुणा होत्या. पोलिसांनी लिप्सीला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला लुधियानाच्या दयानंद हॉस्पिटलमध्ये पाठवले. पण तिथे तिचा मृत्यू झाला. माझे सोन्याचे ब्रेसलेट, चेन आणि रिट्झ कार घेऊन दरोडेखोर पळून गेले," असंही अनोक मित्तलने सांगितले होते.
मात्र लुधियाना पोलिसांनी अवघ्या काही तासांतच मानवी मित्तल हत्या प्रकरणाचा छडा लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. मानवी मित्तल यांची हत्या अन्य कोणी नाही तर तिचा पती अनोक मित्तलने केल्याचे उघड झालं आहे. अनोकने या हत्येसाठी हल्लेखरांना पैसे दिले होते. पोलिसांनी अनोकसह सहा आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोक मित्तलचे त्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका मुलीशी अनैतिक संबंध होते, ज्याची माहिती मानवीला मिळाली होती. त्यांच्या अवैध संबंधात अडसर ठरलेल्या मानवीला दूर करण्यासाठी अनोकने योजना आखली. अनोकने मानवीची अडीच लाख रुपयांची सुपारी देऊन तिची हत्या केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवायला जाण्यापूर्वी आणि जेवल्यानंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना अनोकने आरोपींना फोनवरून माहिती दिली होती. अनोकनेरस्त्यावर कार थांबवली आणि लिप्सीला बाथरूममध्ये जाण्यास सांगून आरोपींना फोन केला होता. त्यानंतर लिप्सी गाडीतून बाहेर यावी म्हणून आरोपींनी आधी अनोकवर मुद्दाम हल्ला केला. लिप्सी कारमधून बाहेर येताच आरोपींनी तिच्यावर हल्ला केला.