Punjab Assembly Election 2022: पंजाबच्या मुख्यमंत्रिपदासाठी माझ्या बाजूने होते ४२ आमदार, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 10:19 AM2022-02-03T10:19:23+5:302022-02-03T10:19:39+5:30
Punjab Assembly Election 2022: काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यानंतर नवीन मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांची मते अजामावली असता ७९ पैकी ४२ आमदार माझ्या बाजूने होते, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी केला आहे.
- बलवंत तक्षक
चंदीगड : काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविल्यानंतर नवीन मुख्यमंत्रिपदासाठी आमदारांची मते अजामावली असता ७९ पैकी ४२ आमदार माझ्या बाजूने होते, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी केला आहे.
अबोहर मतदार संघात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात जाखड यांनी उपरोक्त दावा केला. ते असेही म्हणाले की, चरणजित सिंग चन्नी यांच्या बाजूने त्यावेळी फक्त दोनच आमदार होते, तरी ते मुख्यमंत्री झाले. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांच्या बाजूने १६ आमदार आणि खासदार परणित कौर यांच्या बाजूने १२ आमदार होते. प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बाजूने ६ आमदार होते.
चन्नी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी मला उपमुख्यमंत्रिपद देऊ केले होते. परंतु, यासाठी मी तयार नव्हतो. मी आमदार नसतानाही मुख्यमंत्रिपदासाठी माझे नाव घेण्यात आले होते. याबद्दल मी पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेसच्या आमदारांचा आभारी आहे.
श्रेष्ठींनी जाखड यांना बंगळुरूहून बोलावले तेव्हा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या जागी मुख्यमंत्रिपद जाखड यांना मिळेल, असे मानण्यात आले होते. परंतु, अखेरच्या क्षणी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या अंबिका सोनी यांनी पंजाबचा मुख्यमंत्री शीख समुदायाची व्यक्तीच असावी, असे स्पष्ट केल्याने जाखड या शर्यतीत मागे पडले.