Punjab Assembly Election 2022: कुमार विश्वास यांच्या आरोपांवर AAP चे प्रत्युत्तर, राघव चड्ढा म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 04:32 PM2022-02-17T16:32:58+5:302022-02-17T16:33:35+5:30
Punjab Assembly Election 2022: आपचे नेते आणि आमदार राघव चड्ढा यांनी कुमार विश्वास यांच्या आरोपामागे षडयंत्र रचले जात असल्याचे म्हटले आहे.
नवी दिल्ली: आम आदमी पक्षाचे माजी नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी आम आदमी पक्षाचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर फुटीरतावाद्यांचे समर्थक असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान, कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर केलेल्या आरोपांना आम आदमी पक्षाने प्रत्युत्तर दिले आहे. आपचे नेते राघव चड्ढा यांनी विश्वास यांच्या आरोपांना अपप्रचार असल्याचे म्हटले आणि अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात षडयंत्र रचले जात असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या दोनच दिवस आधी कुमार विश्वास यांना या गोष्टी का आठवल्या? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
कुमार विश्वास 2017 पूर्वी काहीही का बोलले नाहीत? ते आतापर्यंत गप्प का होते? असेही राघव चड्ढा यांनी विचारले. तसेच, अरविंद केजरीवाल यांच्यावर खोटे व्हिडिओ टाकून त्यांची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. पंजाबमधील वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, जनता आमच्यासोबत आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते कुमार विश्वास?
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल हे पंजाबमध्ये दहशतवाद्यांचे समर्थन करत आहेत, असा आरोप केला आहे. तसेच त्यांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा फॉर्म्युला सांगितला होता. कुमार विश्वास म्हणाले की, अरविंद केजरीवाल तेव्हा म्हणाले होते की, एकेदिवशी मी पंजाबचा मुख्यमंत्री बनेन किंवा स्वतंत्र देश असलेल्या खलिस्तानचा पंतप्रधान बनेन. मात्र त्यावेळी मी केजरीवाल यांना फुटीरतावाद्यांना सोबत न घेण्याचा सल्ला दिला होता, असे कुमार विश्वास म्हणाले होते.
राहुल गांधींनीही केली होती टीका
राहुल गांधी यांनीही एका सभेमध्ये बोलताना अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली होती. काँग्रेसचे नेते दहशतवाद्यांचा घरी दिसणार नाहीत, मात्र झाडूचा सर्वात मोठा नेता दहशतवाद्याच्या घरी जातो, असे ते म्हणाले होते. 2017 निवडणुकीवेळी अरविंद केजरीवाल हे मोगामध्ये पूर्वाश्रमीच्या खलिस्तानी दहशतवाद्याच्या घरी थांबले होते, त्या आधारावर राहुल गांधी यांनी ही टिप्पणी केल्याचे बोलले जात आहे.