Punjab Assembly Election Result: मी लिहून देतो, तुम्ही बघाच! केजरीवालांची दोन्ही भाकितं खरी ठरली; आपला लॉटरीच लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 03:45 PM2022-03-10T15:45:40+5:302022-03-10T15:46:11+5:30
Punjab Assembly Election Result: अरविंद केजरीवालांची भविष्यवाणी खरी ठरली; आपचा बंपर विजय
चंदिगढ: पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या झाडूनं झंझावाती कामगिरी केली आहे. आपच्या झाडूचा फटका काँग्रेसला बसला आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यासह काँग्रेसचे बडे नेते पराभूत झाले आहेत. गेल्या निवडणुकीत ७७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यंदा २० जागादेखील मिळताना दिसत नाहीत. आपच्या मुसंडीसमोर सगळ्याच पक्षांची दाणादाण उडाली आहे.
जवळपास महिन्याभरापूर्वी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात दोन भाकितं वर्तवली होती. मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी दोन्ही मतदारसंघात पराभूत होतील, अशी भविष्यवाणी केजरीवाल यांनी केली होती. चन्नी यांचा दोन्ही मतदारसंघात पराभव झाला आहे. विशेष म्हणजे दोन्ही मतदारसंघात त्यांनी आपच्या उमेदवारांनी पराभूत केलं आहे. चमकौर साहिब आणि भदौरमध्ये चन्नी यांनी धक्का बसला आहे.
आपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान किमान ५१ हजार मतांनी विजयी होतील, अशी भविष्यवाणी केजरीवाल यांनी वर्तवली होती. धुरी मतदारसंघातून मान ५६ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार दलवीर सिंग गोल्डी यांना पराभूत केलं आहे. केजरीवालांच्या आपनं पंजाबमध्ये ११७ पैकी ९२ जागांवर आघाडी घेतली आहे. आपच्या झाडूपुढे काँग्रेसचा पालापाचोळा झाला आहे.