पंजाबमध्ये सर्वसामान्यांना मोठा झटका, भगवंत मान सरकारनं वीज सबसिडी हटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 03:50 PM2024-09-05T15:50:04+5:302024-09-05T15:50:29+5:30
Punjab : मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
चंदीगड : पंजाबमध्ये सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे. भगवंत मान सरकारने विजेवरील सबसिडी हटवली आहे. गुरुवारी पंजाब मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे ६१ पैसे आणि ९२ पैशांनी वाढ करण्यात आली. यासोबतच घरगुती वीजग्राहकांना ७ किलोवॅटपर्यंत लागू असलेली सबसिडी वीज योजनाही मागे घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पेट्रोलवर ६१ पैसे आणि डिझेलवर ९२ पैसे प्रति लीटर व्हॅट वाढवण्यात येणार आहे.
इंधनावरील व्हॅटमध्ये वाढ केल्याने डिझेलमधून ३९५ कोटी रुपये आणि पेट्रोलमधून १५० कोटी रुपयांची महसूल वाढण्याची अपेक्षा आहे, असे हरपाल सिंग चीमा यांनी सांगितले. दरम्यान, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंजाब सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. राज्याच्या तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी सरकारच्या मोठ्या रणनीतीचा हा एक भाग आहे.
ऑगस्ट महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना चार दिवसांच्या विलंबाने पगार आणि पेन्शन मिळाली होती. या वर्षी मार्चमध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री हरपाल चीमा यांनी अंदाज व्यक्त केला होता की, २०२४-२५ पर्यंत राज्याचे कर्ज ३.७४ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल. हे राज्याच्या एकूण जीडीपीच्या (८ लाख कोटींहून अधिक) ४६ टक्क्यांहून अधिक आहे.
दरम्यान, पंजाबच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे, राज्य सरकारला जुलैमध्ये १६ व्या वित्त आयोगाकडे मदत पॅकेजची मागणी करावी लागली. भगवंत मान यांनी राज्याच्या विकासाला गती देण्यासाठी १.३२ लाख कोटी रुपयांची मागणी केली होती.