पंजाबमध्ये दहा मंत्र्यांनी घेतली शपथ; मंत्रिमंडळात डॉ. बलजीत कौर एकमेव महिला मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 08:34 AM2022-03-20T08:34:54+5:302022-03-20T08:36:54+5:30
राजभवन येथे आयोजित समारंभात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपल्या मंत्रिमंडळात १० मंत्र्यांचा समावेश केला. राजभवन येथे आयोजित समारंभात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्रिमंडळातील सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मंत्रिमंडळात डॉ. बलजीत कौर या एकमेव महिला मंत्री आहेत.
मंत्रिमंडळात ज्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यात आपचे आमदार हरपाल सिंग चीमा, हरज्योत सिंग बैस, गुरमीत सिंग हेयर, डॉ. विजय सिंगला, बृह्म शंकर जिंपा, हरभजन सिंग ईटीओ, लालचंद कटारुचक्क, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर आणि डॉ. बलजीत कौर यांचा समावेश आहे. यातील आठ मंत्री प्रथमच निवडून आले आहेत. मुख्यमंत्री मान यांच्यासह चार जट्ट शीख, तीन हिंदू आणि चार अनुसूचित जातीचे सदस्य आहेत. हरपाल सिंग चीमा हे आपचा अनुसूचित जातीचा सर्वांत मोठा चेहरा आहेत. तर, बृह्म शंकर जिंपा हे हिंदू चेहरा आहेत. हरज्योत सिंग बैंस (३१) हे सर्वांत कमी वयाचे आहेत. तर, कुलदीप धालीवाल सर्वांत ज्येष्ठ (६०) आहेत. या सोहळ्याला मान यांचे चिरंजीव दिलशान आणि सीरत कौर हेही उपस्थित होते. मंत्रिमंडळात मालवा क्षेत्राला झुकते माप देण्यात आले आहे. बृह्म शंकर जिंपा यांची संपत्ती सर्वाधिक ८ कोटी तर, कटारुचक्क यांची संपत्ती सर्वांत कमी ६ लाख इतकी आहे.
कुलतार सिंग संधवा विधानसभेचे अध्यक्ष
कोटकपुरा मतदारसंघातील आमदार कुलतार सिंग संधवा हे विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत. ते आपच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणूक जिंकले आहेत. ऑटोमोबाइल इंजिनीअर संधवा हे माजी राष्ट्रपती स्व. ग्यानी झैल सिंग यांच्या लहान भावाचे नातू आहेत. आपचे प्रवक्ते म्हणून काँग्रेस सरकारला घेरण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे.
२५ हजार नोकऱ्यांना मंजुरी
पंजाब मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत २५ हजार सरकारी नोकऱ्यांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तरुणांना रोजगार देण्याचा निर्णय घेण्यात आला. सरकारी कार्यालये आणि महामंडळ यातील २५ हजार रिक्त पदे भरली जाणार आहेत. पंजाबमध्ये सध्या एक लाख पदे रिक्त आहेत, तर ३६ हजार कर्मचारी नियमित होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आपने निवडणुकीत प्रत्येक घराला ३०० युनिट मोफत वीज आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांना एक हजार रुपये प्रतिमहिना देण्याची घोषणा केली होती. वाळूमाफिया, केबलमाफिया यांची साखळी समाप्त करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री मान यांनी सांगितले की, हे आश्वासने पूर्ण करण्यासाठी लवकरच पावले उचलली जातील.