जनसेवेत एकाही दिवसाचा खंड पडू देणार नाही- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 10:14 AM2022-03-17T10:14:25+5:302022-03-17T10:15:02+5:30
हजारो नागरिकांच्या साक्षीने झाला शपथविधी
शहीद भगतसिंग नगर : आम आदमी पक्षाचे (आप)चे नेते भगवंत मान यांनी बुुधवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची जंगी सोहळ्यात पंजाबी भाषेत शपथ घेतली. शहीद भगतसिंग यांच्या खटकड कलान या मूळ गावी झालेल्या या समारंभाला आपचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. मी एकही दिवस वाया न घालविता जनतेच्या हिताचे निर्णय घेईन. राज्यामधील बेकारी व भ्रष्टाचार संपविण्यासाठी अथक प्रयत्न करेन, असे आश्वासन भगवंत मान यांनी जनतेला दिले.
पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आपने काँग्रेस व अन्य पक्षांचा दणदणीत पराभव केला होता. भगवंत मान यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एक जाहीर सभा झाली. त्यात मान म्हणाले की, मी माझ्या कामाला लगेचच सुरुवात करणार आहे. उत्तम काम करण्यासाठी आधीच ७० वर्षे उशीर झाला आहे. या शपथविधीनंतर भगवंत मान यांनी चंदीगड येथे मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन सूत्रे स्वीकारली व कामाला प्रारंभ केला.
माजी स्टँड-अप कॉमेडियन असलेले भगवंत मान यांना राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. बुधवारी फक्त मान यांचाच शपथविधी पार पडला. त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी लवकरच होणार असल्याचे आपच्या सूत्रांनी सांगितले. मान यांच्या शपथविधीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काही मंत्री व पंजाबमधील आपचे सर्व आमदार उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
पंजाबमध्ये आपने ११७ पैकी ९२ जागा जिंकल्या आहेत. दिल्लीनंतर आता पंजाबमध्ये या पक्षाची सत्ता आली आहे. भगवंत मान यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.