'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच लागू होणार जुनी पेन्शन योजना!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 02:25 PM2022-09-19T14:25:50+5:302022-09-19T14:27:08+5:30
Old Pension Scheme : सत्तेत आल्यापासून आम आदमी पक्षाचे सरकार जनतेच्या हिताचे एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसून येत आहे.
चंडीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने (Aam Aadmi Party Government) कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. सत्तेत आल्यापासून आम आदमी पक्षाचे सरकार जनतेच्या हिताचे एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेताना दिसून येत आहे.
जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यासाठी (Old Pension Scheme) चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले. आगामी काळात पंजाब सरकार जुनी पेन्शन रिस्टोरेशनवर (Old Pension Restoration) काम करेल. या संदर्भात पंजाबच्या मुख्य सचिवांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्यावर काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम आदमी पक्षाचे सरकार जुनी पेन्शन पुनर्स्थापित करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.
My government is considering reverting to the Old Pension System (OPS). I have asked my Chief Secretary to study the feasibility and modalities of it’s implementation. We stand committed to the welfare of our employees.
— Bhagwant Mann (@BhagwantMann) September 19, 2022
यासंदर्भात मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट सुद्धा केले आहे. ते म्हणाले की, पंजाब सरकारमध्ये कार्यरत कर्मचारी जुनी पेन्शन बहाल करण्याची मागणी सातत्याने करत आहेत. निवडणुकीच्या वेळी आम आदमी पक्षाने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले होते, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
दरम्यान, पंजाबचे भगवंत मान यांनी गेल्या महिन्यात पंजाबमध्ये एक आमदार, एक पेन्शन कायदा लागू केला होता. अनेक वर्षांचा जुना एकापेक्षा जास्त पेन्शन देणारा कायदा रद्द करण्यात आला. पंजाबमध्ये मान सरकारने मंजूर केलेल्या विधेयकाला राज्यपालांची मंजुरी मिळाल्यानंतर अधिसूचना जारी केली जाईल.
Wow! A great decision. All govt employees across India want Old pension scheme to be restored. https://t.co/rOll0SY5CU
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) September 19, 2022
योजना पूर्ववत व्हावी, अशी सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची इच्छा - अरविंद केजरीवाल
दुसरीकडे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केलेल्या ट्विटला रिट्विट करत म्हटले आहे की, "खूप छान! एक उत्तम निर्णय. जुनी पेन्शन योजना पूर्ववत व्हावी, अशी देशभरातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची इच्छा आहे."