Bhagwant Mann : पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत भगवंत मान यांची मोठी घोषणा, महिन्याभरात 25 हजार सरकारी पदांची भरती होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 05:16 PM2022-03-19T17:16:11+5:302022-03-19T17:23:58+5:30
CM Bhagwant Mann First Cabinet Meeting : मुख्यमंत्री भगवंत मान शपथ घेतल्यापासून कृतीत दिसत आहेत. भगवंत मान यांनी आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पंजाबमधील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे.
नवी दिल्ली : पंजाब विधानसभा निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवल्यानंतर राज्यात आम आदमी पार्टीचे (आप) सरकार स्थापन झाले आहे. शनिवारी मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी मंत्रिमंडळाची पहिली बैठक (Punjab Cabinet Meeting) घेतली. या बैठकीत आज शपथ घेतलेल्या दहा नव्या चेहऱ्यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला. याआधी 16 मार्चला म्हणजे तीन दिवसांपूर्वी भगवंत मान यांनी शहीद भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत मान शपथ घेतल्यापासून कृतीत दिसत आहेत. भगवंत मान यांनी आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पंजाबमधील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. शनिवारी नव्या मंत्र्यांसोबतच्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत त्यांनी महिन्याभरात 25 हजार सरकारी नोकऱ्या देण्याची मोठी घोषणा केली आहे. 00
भगवंत मान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत 25 हजार पदे तातडीने भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये 10 हजार पदे पोलीस विभागातील तर 15 हजार पदे अन्य शासकीय विभागातील असतील. या भरतीमध्ये मंडळ आणि महामंडळ विभागाची पदेही भरली जाणार आहेत. तसेच, राज्याचे नवे सरकार आपला पहिला अर्थसंकल्प जून महिन्यात सादर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
The Cabinet has passed the proposal of providing a total of 25,000 govt jobs, including 10,000 vacancies in the Punjab Police department & 15,000 vacancies in other govt departments: Punjab CM Bhagwant Mann, after his first cabinet meeting
— ANI (@ANI) March 19, 2022
(Source: CMO) pic.twitter.com/hJgn4TVppa
तत्पूर्वी, शनिवारी सकाळी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एका महिलेसह आम आदमी पार्टीच्या (आप) दहा आमदारांचा समावेश करण्यात आला. पंजाब भवन येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या 10 मंत्र्यांपैकी आठ पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. या सर्वांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली.
भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होणार्या 10 मंत्र्यांमध्ये हरपाल सिंग चीमा, डॉ. बलजीत कौर, हरभजन सिंग ईटीओ, डॉ. विजय सिंगला, गुरमिर सिंग मीत हायर, हरजोत सिंग बैंस, लाल चंद कटारुचक, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रह्म.शंकर झिंपा यांचा समावेश आहे. परंतू ज्या आमदारांनी मोठमोठ्या हस्तींना हरविण्याची किमया साधली त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही.
कुलतार सिंग संधवान विधानसभा अध्यक्ष
नियमांनुसार भगवंत मान आपल्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 17 मंत्री नेमू शकतात. पंजाब विधानसभेत 117 सदस्य आहेत. कोटकपुरा येथून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले कुलतार सिंग संधवान हे पंजाब विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत.