पंजाब CM भगवंत मान यांनी तुरूंगात घेतली अरविंद केजरीवालांची भेट, मोठा निर्णय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 08:12 AM2024-06-13T08:12:33+5:302024-06-13T08:13:43+5:30

४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भगवंत मान आणि केजरीवाल यांच्यातील ही पहिलीच भेट होती

Punjab CM Bhagwant Mann met Arvind Kejriwal in Tihar jail after Lok Sabha Election Result 2024 | पंजाब CM भगवंत मान यांनी तुरूंगात घेतली अरविंद केजरीवालांची भेट, मोठा निर्णय होणार?

पंजाब CM भगवंत मान यांनी तुरूंगात घेतली अरविंद केजरीवालांची भेट, मोठा निर्णय होणार?

Bhagwant Mann Arvind Kejriwal, Tihar Jail: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या भेटीदरम्यान पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीवर चर्चा केली. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भगवंत मान आणि केजरीवाल यांच्यातील ही पहिलीच भेट होती. अबकारी कर धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अरविंद केजरीवाल तिहार तुरुंगात बंद आहेत.

२०२४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने पंजाबमध्ये १३ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. सत्ताधारी आप आणि विरोधी पक्ष भाजप तसेच शिरोमणी अकाली दलाला निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. 'आप'ला होशियारपूर, आनंदपूर साहिब आणि संगरूर या फक्त तीन जागा मिळाल्या आहेत तर दोन अपक्ष उमेदवारांनी निवडणुका जिंकल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे AAP ला निवडणुकीत २६ टक्के मते मिळाली. २०१९ मध्ये हा आकडा केवळ ७.३८ टक्के होता.

पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. दिल्लीत काँग्रेस आणि आप यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली असली तरी दिल्लीतील सातही जागा काबीज करण्यात भाजपला यश आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर 'आप'चे नेते आणि मंत्री गोपाल राय म्हणाले होते की, 'आप' आणि काँग्रेसमध्ये जागांबाबतचा करार केवळ लोकसभा निवडणुकीपुरता होता. 'आप' विधानसभा निवडणूक एकट्याने लढवणार आहे.

गोपाल राय यांच्या वक्तव्यानंतर आगामी काळात आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये कोणतीही आघाडी होणार नसल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री मान यांच्यात तुरूंगात झालेली भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण लोकसभा निवडणुकीदरम्यान सीएम मान आणि सीएम केजरीवाल यांनी एकत्र अनेक सभा आणि रोड शो केले होते.

दरम्यान, आमदार आणि कॅबिनेट मंत्री गुरमीत सिंग मीत हैर यांनी संगरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्याने एक विधानसभा मतदारसंघ रिक्त होणार आहे. पक्षाने लोकसभा निवडणुकीत पाच कॅबिनेट मंत्र्यांसह आठ आमदारांना उभे केले होते, परंतु केवळ गुरमीत सिंग मीत हैर यांनाच विजय मिळवता आला.

Web Title: Punjab CM Bhagwant Mann met Arvind Kejriwal in Tihar jail after Lok Sabha Election Result 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.