पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 01:37 PM2022-05-24T13:37:24+5:302022-05-24T13:46:16+5:30
Bhagwant Mann : विजय सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रीपदावरून हटवले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भ्रष्टाचाराबाबत कठोर भूमिका घेत मोठी कारवाई केली आहे. भगवंत मान यांनी आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून मंत्रिमंडळातून काढून टाकले आहे. मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार, विजय सिंगला यांनी कंत्राटे देताना टक्केवारी कमिशनची मागणी केली होती. विजय सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रीपदावरून हटवले आहे.
विजय सिंगला यांच्यावर कारवाई करताना भगवंत मान म्हणाले, "अरविंद केजरीवाल यांनी मला सांगितले की, मी लाचखोरी, एका पैशाची बेईमानी सहन करू शकत नाही. मी वचन दिले होते की ते होणार नाही. आंदोलनातून बाहेर पडलेले आम्ही लोक आहोत आणि ते आंदोलन भ्रष्टाचाराच्या विरोधात होते." याचबरोबर, भगवंत मान पुढे म्हणाले की, एक प्रकरण माझ्या लक्षात आले. माझ्या सरकारचे मंत्री या प्रकरणात सहभागी होते.
एका कंत्राटात माझ्या सरकारचे मंत्री एक टक्का कमिशन मागत होते. या प्रकरणाची माहिती फक्त मलाच होती. हे प्रकरण दडपता आले असते. पण असे करणे फसवणूक झाली असती. त्यामुळे मी त्या मंत्र्यावर कारवाई करत आहे. त्यावर तातडीने कारवाई करण्यात येत आहे. विजय सिंगला असे या मंत्र्याचे नाव असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येत आहे, असे भगवंत मान यांनी सांगितले.
विजय सिंगला यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, विजय सिंगला यांनी आरोग्य मंत्रालयात भ्रष्टाचार केला. विजय सिंगला यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की आम आदमी पक्षाचे सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध जीरो टॉलरेंस ठेवेल. हे काम स्वातंत्र्यानंतर दुसऱ्यांदा करण्यात आले आहे. दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 2015 मध्ये आपल्या मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हटवले होते.
दुसऱ्यांदा निवडणूक जिंकणाऱ्या नेत्यांकडे लक्ष वेधून विजय सिंगला यांना मंत्री करण्यात आले होते. एवढेच नाही तर दिल्लीच्या आरोग्य मॉडेलचा प्रचार करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सरकारने विजय सिंगला यांच्याकडे आपल्या महत्त्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी दिली होती. मात्र, मंत्री झाल्यानंतर दोनच महिन्यात आता भष्ट्राचाराच्या प्रकरणानंतर त्यांना पद गमवावे लागले.