पंजाबचे CM कॅप्टन अमरिंदर सिंह आज PM मोदींची भेट घेणार! 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 09:43 AM2021-08-11T09:43:36+5:302021-08-11T09:44:55+5:30
तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. (Punjab CM Capt Amarinder Singh)
नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर पंजाबचेमुख्यमंत्री अमरिंदर सिंग आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी मंगळवारी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी, अमित शाह यांच्याकडे शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावर हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. यामुळे आता पीएम मोदींच्या भेटीदरम्यान अमरिंदर सिंग कृषी कायदे रद्द करण्यासंदर्भात आग्रह करू शकतात, असा अंदाज लावला जात आहे. (Punjab cm captain Amarinder Singh likely to meet pm modi today)
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता -
पंजाबमधील बहुतांश शेतकरी गेल्या वर्षभरापासून नव्या कृषी सुधारणा कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. केंद्रातील मोदी सरकारने लागू केलेले तीनही कायदे मागे घेण्यात यावेत, अशी त्यांची मागणी आहे. तर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग, सामाजिक, आर्थिक आणि सुरक्षेचा हवाला देत पंतप्रधान मोदींसोबत कायदे रद्द करण्यासंदर्भात चर्चा करू शकतात.
अमित शहा यांची भेट -
तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी शाह यांना शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले होते. यासंदर्भात माहिती देताना, मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचे माध्यम सल्लागार म्हणाले होते, की अमरिंदर सिंग यांनी शहा यांना विरोधी शक्तींना शेतकऱ्यांच्या रोषाचा गैरफायदा घेण्यापासून रोखण्याचेही आवाहन केले.
याशिवाय, अमरिंदर सिंग पीएम मोदीसोबत पंजाबच्या सुरक्षिततेसंदर्भातही चर्चा करू शकतात. अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीदरम्यान त्यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 25 कंपन्या आणि सीमा सुरक्षा दलासाठी (बीएसएफ) ड्रोनविरोधी उपकरणांची मागणीही केली होती. तसेच, पाकिस्तानी दहशतवादी पंजाबलाही लक्ष्य करू शकतात, असेही ते म्हणाले होते.