charanjit singh channi : पंजाबचे मुख्यमंत्री बनताच चरणजित सिंह चन्नी यांनी शेतकऱ्यांना दिलं मोठं 'गिफ्ट', पाणी आणि वीज बिल होणार माफ!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 03:02 PM2021-09-20T15:02:26+5:302021-09-20T15:10:38+5:30
punjab cm charanjit singh channi : चंदीगडमध्ये पहिल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना चरणजित सिंह चन्नी भावूक झाले.
चंदिगड : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शेतकरी आणि सामान्य लोकांना मोठी भेट दिली आहे. शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत चन्नी म्हणाले, 'पंजाब सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. आम्ही शेतकऱ्यांचे पाणी आणि वीज बिल माफ करू. आम्ही केंद्राला तीन कृषी कायदे मागे घेण्याचे आवाहन करतो. जर हे तीन कायदे मागे घेतले नाहीत तर शेती संपेल आणि पंजाबमधील प्रत्येक कुटुंबीयांवर याचा परिणाम होईल.
चंदीगडमध्ये पहिल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना चरणजित सिंह चन्नी भावूक झाले. स्वतः गरीब कुटुंबात जन्माला आल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, ही मोठी जबाबदारी दिल्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाचे आभार. काँग्रेसने सामान्य माणसाला मुख्यमंत्री बनवले आहे. पक्ष सर्वोच्च आहे. मुख्यमंत्री किंवा आमदार सर्वोच्च नाहीत.
The party is supreme, not the CM or the cabinet. The government will work as per the party's ideology: Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/3cfoSlcjfu
— ANI (@ANI) September 20, 2021
याचबरोबर, सरकार कॉंग्रेसच्या विचारधारेवर चालणार आहे, जे सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे. जात किंवा पंथाच्या नावाने कोणीही फोडू शकत नाही. पंजाबची एकता, अखंडता आणि बंधुता राखली पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र राहायचे आहे. पंजाबला पुढे नेले पाहिजे, असे चरणजित सिंह चन्नी यांनी सांगितले.
दरम्यान, वाळू माफियांवर कारवाई केली जाईल आणि सर्व प्रश्न सोडवले जातील असेही चरणजित सिंह चन्नी म्हणाले. काँग्रेस नेतृत्वाने ठरवलेल्या 18 कलमी कार्यक्रमाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, राज्यातील जनतेला आश्वासन देतो की, येत्या काही दिवसात सर्व समस्या सोडवल्या जातील. याशिवाय, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबाबत चरणजित सिंह चन्नी म्हणाले, 'ते आमचे नेते आहेत. कॅप्टन सरकारचे अपूर्ण काम आम्ही पूर्ण करू.'
Captain Amarinder Singh did a lot of good work for the people of Punjab. We will take forward his work: Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/SmMdeO1YRk
— ANI (@ANI) September 20, 2021
राहुल गांधी हे क्रांतिकारी नेते - चरणजित सिंह चन्नी
राहुल गांधी हे क्रांतिकारी नेते आहेत. मी पंजाब प्रदेश काँग्रेस, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पंजाबच्या लोकांचा आभारी आहे. मी स्वतः रिक्षाचालक राहिलो आहे. मी कुणालाही कृषी क्षेत्राला दुखवू देणार नाही. मी केंद्राला तीन कृषी कायदे मागे घेण्याचे आवाहन करतो. मी शेतकऱ्यांच्या लढ्याला पूर्ण पाठिंबा देतो, असे चरणजित सिंह चन्नी म्हणाले.
We will waive water and electricity bills of farmers: Punjab CM Charanjit Singh Channi pic.twitter.com/YVXTMH5MbC
— ANI (@ANI) September 20, 2021
दरम्यान, विशेष म्हणजे राज्यातील विरोधी पक्ष आम आदमी पक्षाने (आप) जाहीर केले होते की, आगामी निवडणुकांनंतर आपचे सरकार आल्यास मोफत वीज आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. अशा परिस्थितीत काँग्रेस सरकार जनतेमध्ये आपल्या विरोधकांना विशेष संधी देऊ नये, यासाठी प्रयत्न करत आहे.
चरणजित सिंग चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!
चरणजित सिंग चन्नी यांनी घेतली पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी त्यांना शपथ दिली. राजभवनात हा शपथग्रहण सोहळा सुरू आहे. चन्नी यांच्या व्यतिरिक्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी काँग्रेस नेते सुखजिंदर सिंग रंधावा यांना मंत्री पदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित आहेत. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी चन्नी यांना शपथ घेतल्यानंतर भेटून शुभेच्छा दिल्या आहेत.