भगवंत मान यांनी दिला खासदारकीचा राजीनामा; म्हणाले, "सभागृहाची खूप आठवण येईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 05:44 PM2022-03-14T17:44:23+5:302022-03-14T17:45:04+5:30
Bhagwant Mann : भगवंत मान यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनात हजेरी लावली आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला.
नवी दिल्ली : पंजाबमध्ये ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर आम आदमी पार्टीचे (AAP) नेते भगवंत मान यांनी सोमवारी संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. भगवंत मान हे संगरूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. पण आता ते 16 मार्चला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
राजीनामा देण्यापूर्वी भगवंत मान यांनी ट्विट केले की, "मी आज दिल्लीला जात असून संगरूरच्या खासदारकीचा राजीनामा देत आहे. संगरूरच्या जनतेने इतकी वर्षे मला भरभरून प्रेम दिले, त्याबद्दल खूप खूप आभार. आता मला संपूर्ण पंजाबची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मी संगरूरच्या जनतेला वचन देतो की काही महिन्यांत त्यांचा आवाज लोकसभेत उठणार आहे."
तसेच, ते म्हणाले की, सभागृहाची खूप आठवण येईल पण पंजाबच्या जनतेने आता माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. दरम्यान, भगवंत मान यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनात हजेरी लावली आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सुपूर्द केला.
आइये सभी मिलकर शहीद भगत सिंह जी के सपनों का पंजाब बनाएं, 16 मार्च, बुधवार को खटकड़ कलां में शपथग्रहण समाहरो में आने का आप सभी को निमंत्रण देता हूँ।
— Bhagwant Mann (@BhagwantMann) March 14, 2022
पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 117 जागांवर निवडणूक लढवली होती. 117 पैकी 92 जागा आम आदमी पार्टीने जिंकल्या आहेत. त्यामुळे आता पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार बनणार आहे. पंजाबमधील निवडणुकीपूर्वीच आम आदमी पक्षाने 48 वर्षीय भगवंत मान यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. आता ते 16 मार्चला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नवनशहर जिल्ह्यात शहीद भगतसिंग यांचे मूळ गाव खटकर कलान येथे शपथविधी सोहळा होणार आहे.