देवाच्या आणा-भाकांच्या आधारे देणार निकाल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 01:27 AM2018-05-09T01:27:54+5:302018-05-09T01:27:54+5:30
दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून व पुरावे तपासून न्यायालये कायद्यानुसार निकाल देतात हे सर्वश्रुत आहे. हल्ली प्रलंबित दावे लवकर निकाली निघावेत यासाठी तंटा निवारणाच्या नव्या पर्यायांना प्रोत्साहन दिले जात आहे.
चंदीगढ : दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून व पुरावे तपासून न्यायालये कायद्यानुसार निकाल देतात हे सर्वश्रुत आहे. हल्ली प्रलंबित दावे लवकर निकाली निघावेत यासाठी तंटा निवारणाच्या नव्या पर्यायांना प्रोत्साहन दिले जात आहे. पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी हेच सूत्र पकडून पक्षकाराला देवाच्या आणा-भाका करण्यास सांगून, निर्णय देण्याचे ठरविले आहे.
काश्मीर सिंग व नरेंद्र पाल सिंग या दोन नातेवाईकांत एका मालमत्तेच्या व्यवहारावरून वाद आहे. मालमत्तेच्या ४.६० लाख रुपयांपैकी ४.३० लाख रुपये आपण नरेंद्र पाल सिंग यांना दिले आहेत, असा काश्मीर सिंग
यांचा दावा आहे. याउलट काश्मीर सिंग यांनी आपल्याला एक छदामही दिलेला नाही व मालमत्ता विक्रीचा त्यांनी बनावट विक्रीकरार बनावट केला, असा नरेंद्र पाल सिंग यांना प्रतिवाद आहे.
या संबंधीचे अपील न्या. अजय तिवारी यांच्यापुढे आहे. याआधी न्या. तिवारी यांनी दोन्ही पक्षांच्या विनंतीवरून नाखुशीने सुनावणी तहकूब केली होती. दोन दिवसांपूर्वी अपील पुन्हा सुनावणीस आले, तेव्हा दोन्ही पक्षांनी आपसात सहमतीने तंटा मिटविण्याचे ठरल्याचे सांगितले व त्यानुसार न्यायालयाने प्रकरण निकाली काढावे अशी विनंती केली.
दोन्ही पक्षांनी जी सहमती न्यायालयास कळविली त्यानुसार नरेंद्र पाल सिंग यांनी नदा साहेब गुरुद्वारात यायचे व गुरु ग्रंथसाहेबवर हात ठेवून आपल्याला पैसे मिळाले नसल्याचे शपथपूर्वक सांगायचे. तसे केले तरच काश्मीर सिंग त्यांचे म्हणणे मान्य करून न्यायालयातील अपील मागे घेतील. नरेंद्र पाल सिंग यांनी शपथ न घेतल्यास ते खोटे बोलत असल्याचे मानून अपील मंजूर केले जाईल व त्यांना पैसे द्यावे लागतील. (वृत्तसंस्था)
प्रसंगाचे चित्रीकरण करा
न्या. तिवारी यांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि त्यानुसार समेट होतो का, हे पाहण्याची त्यांना मुभा दिली. त्यासाठी न्यायमूर्तींनी एका वकिलाची ‘कमिशनर’ म्हणून नेमणूक केली.
त्यांनी गुरुद्वारामध्ये हजर राहून व समेटानुसार नरेंद्र पाल सिंग शपथ घेतात की नाही ते पाहून, त्या प्रसंगाचे व्हिडीओ चित्रीकरण करून न्यायालयास अहवाल द्यावा, असे सांगितले. ‘कमिशनर’ नेमलेले वकील जो अहवाल देतील. त्यानुसार, न्या. तिवारी पुढील तारखेला अपिलावर निर्णय देतील.